Manoj Jarange-Patil: मनोज जरांगे-पाटील ३० सप्टेंबरपासून राज्यव्यापी दौऱ्यावर | पुढारी

Manoj Jarange-Patil: मनोज जरांगे-पाटील ३० सप्टेंबरपासून राज्यव्यापी दौऱ्यावर

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाशी संवाद साधण्यासाठी तसेच समाजाला शांततेचे आवाहन करण्यासाठी ३० सप्टेंबर ते ११ ऑक्टोबरपर्यत १२ दिवसांचा राज्यव्यापी दौरा करणार आहे, अशी माहिती मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी आज (दि.२७) पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा या जिल्ह्यातील समाज बांधवांच्या भेटी घेवून चर्चा करणार आहे. तसेच शांततेचे आवाहन करण्यासाठी, समाजाचे आशीर्वाद घेण्यासाठी हा दौरा करणार आहे. या दरम्यान प्रत्येकाकडे जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी ठरलेल्या ठिकाणी भेटीसाठी यावे, असेही त्यांनी  (Manoj Jarange-Patil) सांगितले.

१४ ऑक्टोबरला अंतरवालीत मराठा समाजाचा राज्यव्यापी संवाद मेळावा घेण्यात येणार आहे. मोठा कार्यक्रम होणार आहे. यात राज्यभरातील समाज बांधव येणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आमची भावना व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम होणार आहे.

सरकारने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळण्यासाठी एक महिन्याची वेळ मागितली म्हणून वेळ दिली आहे. आता 5 हजार नोंदी मिळाल्या आहेत, मग जीआर काढण्यात अडचण काय? विदर्भातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले, मग आम्हाला का नाही ?, गायकवाड आयोगाच्या अहवालात मराठा आणि कुणबी एकच आहेत. पुरावे सापडले नाही हे सरकारचे कारण ऐकणार नाही. पुरावे नसले म्हणून मराठयांना आरक्षण नाही, असा कोणता कायदा आहे. याआधी कोणत्या समाजाच्या नोंदी बघून त्या समाजाला आरक्षण दिले. सध्या सरकारला यावर बोलणार नाही, सरकारला दिलेला वेळ पूर्ण झाल्यावर बोलू. सरसकट महाराष्ट्रातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावेच, लागेल असेही ते म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुराव्यांची गरज नाही, सरकार उगीचच आम्हाला डिवचत आहे. आरक्षण देण्याची इच्छाशक्ती ठेवा. ५० टक्क्यांच्या आत वेगळा प्रवर्ग करून आरक्षण दिल्यास घेऊ, पण ५० टक्क्यांच्या वर जाऊ नका.

Manoj Jarange-Patil : विजय वडेट्टीवार यांना १४ तारखेला उत्तर देऊ

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी निजाम कालीन मराठवाड्यातील ६५ लाख अभिलेखाच्या तपासणीत ५ हजार पुरावे सापडले आहेत. त्यानुसार सरसकट आरक्षण देवू नये, असे विधान नुकतेच केले होते. यावर बोलताना ते म्हणाले की, वडेट्टीवार यांच्या म्हणण्यानुसार काहीही होणार नाही, सरकारला सर्व बाजू ग्राहय धराव्या लागतील, सर्व समाज मराठ्यांच्या पाठीशी आहे. ओबीसीला कुठेही धक्का लागणार नाही. मराठा समाज जर ओबीसीत घेतला, तर आरक्षणाला धक्का लागण्याची भीती अनेकांना वाटते, सगळे मराठा कुणबी आहेत. मग आम्ही काय पाप केले आहे, सगळे ओबीसीत गेले मग आम्ही काय पाप केले.

मराठा समजला आरक्षण मिळणार, या भीतीपोटी ओबीसींमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम त्यांचे आणि आमचे ही काही लोक करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

ओबीसींना जरांगे यांचे आवाहन

मराठा आणि ओबीसी यांनी शांततेत राहावे, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. आधी आम्हाला 50 टक्क्यामध्ये आरक्षण द्या. त्यानंतर आरक्षण वाढवून मिळण्यासाठी आपण एकत्र लढू. ओबीसी समाजाने एकमेकांच्या अंगावर जाऊ नये, राजकारणी हे प्रतिष्ठा साठी एका रात्रीत सत्ता बदलतात. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, असेही ते म्हणाले.

हेही वाचा 

Maratha Reservation : मराठा आरक्षणप्रश्नी 14 ऑक्टोबरला विराट मेळावा घेणार : मनोज जरांगे-पाटील

आरक्षण द्या, अन्यथा गाठ माझ्याशी : मनोज जरांगे-पाटील
Maratha Reservation Protest : ‘मनोज जरांगे-पाटील उपोषण मागे घेतील; आम्हाला अपेक्षा…’- मुख्यमंत्री शिंदे

Back to top button