आरक्षण द्या, अन्यथा गाठ माझ्याशी : मनोज जरांगे-पाटील | पुढारी

आरक्षण द्या, अन्यथा गाठ माझ्याशी : मनोज जरांगे-पाटील

जालना; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील यांनी 14 ऑक्टोबरपर्यंत मराठा आरक्षणाचा तिढा सुटला नाही तर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा राज्य सरकारला दिला आहे. त्यांना येथील खासगी रुग्णालयातून गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप करून ते लगेच साखळी उपोषणात सहभागी होण्यासाठी अंतरवाली सराटीत दाखल झाले.

पाच दिवसांपूर्वी त्यांना येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डिस्चार्जनंतर साखळी उपोषणात सहभागी होण्यासाठी अंतरवाली सराटी येथे निघाले असता त्यांचे छत्रपती संभाजीनगर – अंबड रस्त्यावर ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत झाले. अशक्तपणा, थकवा आणि घशाचा संसर्ग झाल्यामुळे ते 17 सप्टेंबरपासून उपचार घेत होते. आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण मागत आहोत, असे सांगून ते म्हणाले, धनगर, ओबीसी आरक्षणाला आमचा विरोध नाही. त्यांना मिळो अथवा न मिळो, आम्ही आमच्या समाजाकरिता मागणी करीत आहोत.

Back to top button