जालना : भोकरदन बाजार समितीवर भाजपचे वर्चस्व कायम; महाविकास आघाडीचा सर्व जागांवर पराभव

जालना : भोकरदन बाजार समितीवर भाजपचे वर्चस्व कायम; महाविकास आघाडीचा सर्व जागांवर पराभव
Published on
Updated on

भोकरदन; विजय सोनवणे : भोकरदन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने १८ पैकी १८ जागा जिंकून बाजार समितीवर पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केले आहे. महाविकास आघाडीला मात्र या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचा हा मोठा पराभव मानण्यात येत आहे.

भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी रविवारी  (दि.२५) मतदान झाले. भोकरदन तालुक्यातील सहा गावांतील १३ मतदान केंद्रांवर मतदान झाले. या निवडणुकीसाठी २ हजार ८२४ मतदारांपैकी २ हजार ५८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांच्या नेतृत्वाखाली राजुरेश्वर शेतकरी विकास पॅनल तर माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे शेतकरी विकास पॅनल निवडणुकीच्या रिंगणात होते. १८ पैकी दोन जागांवर भाजपचे दोन संचालक बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित १६ जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये भाजपने बाजी मारत महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला. राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कैलास पुंगळे, मनीष श्रीवास्तव या मातब्बर नेत्यांना एकही संचालक निवडून आणता आला नाही. त्यामुळे बाजार समितीवर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांनी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

भाजपची ३० वर्षांची सत्ता कायम

भोकरदन-जाफ्राबाद कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना १९७२ या वर्षी झाली. सुरुवातीची काही वर्षे सोडली तर सुमारे ३० वर्षांपासून या बाजार समितीवर भाजपाची सत्ता कायम आहे. या निवडणुकीतही प्रचंड बहुमताने विजय मिळवत बाजार समितीवर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व आमदार संतोष दानवे यांनी आपली सत्ता कायम ठेवली आहे. ऑगस्ट २००८ ला जाफ्राबादची बाजार समिती स्वतंत्र करण्यात आली आहे.

दोन्ही बिनविरोध जागा भाजपच्याच

संचालकपदाच्या १८ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. यापैकी दोन जागा बिनविरोध झाल्याने १६ जागांसाठी मतदान घेण्यात आले. त्यात सहकारी संस्था मतदार संघाच्या विमुक्त भटक्या जाती व जमाती मधून रामलाल चव्हाण तर हमाल व तोलारीच्या जागेवर सोनाजी गणपत दानवे बिनविरोध निवडून आले होते.

विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या निवासस्थानी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने विजयी उमेदवार व त्यांचे समर्थक दिसून आले. ढोल ताशांच्या गजरात विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली.

विजयी उमेदवार :

ग्रामपंचायत मतदार संघ : आनंदाबाई रामराव ढाकणे, यशोदाबाई लक्ष्मण मळेकर, अनिल शेषराव राऊत, सुमनबाई कडुबा शेरकर, टिकाराम धनसिंग मिमरोट, नंदकुमार लक्ष्मण गिर्हे, कल्पना संजय काकडे.
व्यापारी मतदार संघ : सुभाषराव भिकनराव देशमुख, सुभाष सांडु जंजाळ.
सहकारी संस्था मतदार संघ : बालाजी रामभाऊ औटी, अर्चना मुकेश चिने, कौतिकराव नामदेव जगताप, प्रमोद प्रभाकर कुलकर्णी, मगनराव काशिराम मुगटराव, अलका भागवत पोटे, नजीर महमद ईलीयास शेख.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news