…तर विरोधकांना एकदाही गुलाल खेळू देणार नाही : आमदार कुल यांचा विश्वास | पुढारी

...तर विरोधकांना एकदाही गुलाल खेळू देणार नाही : आमदार कुल यांचा विश्वास

राहू; पुढारी वृत्तसेवा : सांगितलेला सल्ला जर तुम्ही प्रामाणिकपणे पाळला, तर विरोधकांना आगामी निवडणुकांमध्ये एकदाही गुलाल खेळू देणार नाही, असा विश्वास दौंडचे आमदार राहुल कुल यांनी कार्यकर्त्यांना दिला. दौंड तालुक्यातील देवकरवाडी, नांदुर, दहिटणे, पाटेठाण, बोरीभडक, लोणारवाडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने सरपंचपदासह सर्वाधिक जागा जिंकत एकहाती सत्ता प्रस्थापित केल्याने विजयी नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा आमदार राहुल कुल यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला, त्या वेळी आमदार कुल बोलत होते.

या वेळी आ. कुल म्हणाले की, सन 2009 ते 2014 मध्ये काही लोकांना ओघाने विधानसभेत काम करण्याची संधी मिळाली. मात्र, त्यांना विधानसभेत कोणताही प्रश्न उपस्थित करता आला नाही. प्रत्येक क्षेत्रात त्यांचे अज्ञान आहे, त्यांना मोबाईलही व्यवस्थित चालवता येत नाही. अनेकदा मलाच फोन येतो, असे म्हणताच उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.

आमदार कुल म्हणाले की, कोरोना कालावधीमध्ये मी प्रामाणिकपणे लोकांची सेवा केली तर विरोधी पक्षाचे खासदार, पदाधिकारी, त्यांच्या ताब्यात असलेल्या जिल्हा परिषद, खरेदी-विक्री संघ, बाजार समिती, दूध संघ अशा कोणत्याही संस्थेने लोकांना मदत केली नाही. केंद्रातील व राज्यातील सरकार आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्यामुळेच भीमा-पाटस कारखाना चालू झाला असून, यामुळे अनेकांच्या पोटात दुखत आहे.

राज्यामध्ये सत्ताबदल होताच तालुक्यातील प्रत्येक गावाला किमान 50 लाखांपेक्षा अधिकचा निधी देण्यात यामुळेच यशस्वी ठरलो असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद, पंचायत समिती आदींच्या कामांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर टक्केवारी द्यावी लागत असून, ही टक्केवारी कोणामुळे द्यावी लागत आहे, याचाही खुलासा संबंधितांनी करण्याची गरज आहे, असा टोला त्यांनी राष्ट्रवादीला लगावला.

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ज्यांनी माघार घेतली, त्यांचे अगोदर आभार मानायला हवेत, असे मत आमदार कुल यांनी व्यक्त केले. तसेच महिला सरपंच जास्त असल्या तरी पतिराजांनी त्यांना त्यांच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप न करता स्वातंत्र्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
या प्रसंगी बाजार समितीचे माजी सभापती मारुती मगर, कैलास आतकिरे, लोणारवाडीचे माजी सरपंच गोरख गाढवे आदींनी मनोगत व्यक्त केले.

या वेळी माजी आमदार रंजना कुल, कांचन कुल, दहिटणेच्या सरपंच आरती गायकवाड, बोरीभडकचे सरपंच कविता कोळपे, नांदुरचे सरपंच युवराज बोराटे, देवकरवाडी सरपंच तृप्ती मगर, लोणारवाडी सरपंच प्रतीक्षा हिवरकर, सुखदेव चोरमले, तुषार बहिरट, अमोल हंबीर, शरद कोळपे आदी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक विकास शेलार यांनी केले. सूत्रसंचालन उमेश देवकर यांनी केले. राहूचे सरपंच दिलीप देशमुख यांनी आभार मानले.

 

Back to top button