लातूर, पुढारी वृतसेवा : महाराष्ट्र शासन, लातूर जिल्हा प्रशासन, सह्याद्री देवराई लातूर, द संस्कृती फाउंडेशन, लातूर वृक्ष चळवळ या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने दुर्मिळ, अतिदुर्मिळ वृक्षसंपदा जतन करण्यासाठी व हर घर नर्सरी या उपक्रमासाठी बीज संकलन मोहीम राबवण्यात आली. एका दिवसात सुमारे १ लाख बी संकलन करण्यात आले असून बी संकलनाच्या या अनोख्या लातूर पॅटर्नचे सर्वत्र कौतूक होत आहे.
एक वृक्ष जेव्हा नष्ट होतो, तेव्हा या वृक्षांवर आधारलेली परिसंस्था, अन्नसाखळीतील काही दुवे लुप्त होतात. यासाठी हे दुर्मिळ वृक्ष तत्काळ संवर्धीत करावे लागतात. लातूरसह जिल्ह्यातील अनेक शहराचा विस्तार वाढत गेला आहे. विकासाची कामे झाली मात्र या नागरिकरणात काही वृक्ष प्रजाती दुर्मिळ तर काही अतिदुर्मिळ झाल्या आहेत. तर काही नष्टही होण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी अशा वृक्षांची बीजे संकलित करुन त्याची रोपे तयार करणे यासाठी उपक्रम राबवला जात आहे. संकलितमध्ये प्रामुख्याने दुर्मिळ वृक्षांच्या प्रजातीचे बी संकलन करण्यात आले. ते सामाजिक वनीकरण ववनविभागाकडे रोपे तयार करण्यासाठी देण्यात आले आहे.
हा बी संकलन उपक्रम रेणापूर, लातूर, चाकूर तालुक्याच्या सीमेवर धवेली, जानवळ, वडवळ, झरी या परिसरात राबविला गेला. बीज संकलनामध्ये मासरोहिणी, आपटा, बेहडा, बहावा, अर्जुन, पळस, गावरान आंब्याच्या कोया अश्या अनेक दुर्मिळ वृक्षांच्या बियांची अकरा पोते संकलन करण्यात आले.
या उपक्रमात नगरपंचायत आयुक्त रामदास कोकरे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, रेणापूर न.प.चे मुख्याधिकारी मंगेश शिंदे, सह्याद्री देवराई लातूरचे समन्वयक सुपर्ण जगताप, द संस्कृती फाऊंडेशनचे अभय मिरजकर, सह्याद्री देवराई व संस्कृती फाउंडेशनचे शिवशंकर चापुले, कृषी अधिकारी गोपाळ शेरखाने, डॉ. दत्तात्रय दगडगावे, राम माने, प्रतिक्षा मोरे यांच्यासह विद्यार्थी, गावकरी, कर्मचारी सहभागी झाले होते.
हेही वाचा :