

सेनगाव : "माझा बाप शेतात दिवसभर कष्ट करतो तेव्हा आमचे घर चालते. हा तलाव रद्द झाला नाही तर पहिला बळी माझाच असेल" असा १४ वर्षांच्या मुलाने थेट इशारा दिला. सेनगाव तालुक्यातील सुकळी येथे शुक्रवारी २१ ऑगस्ट रोजी प्रस्तावित साठवण तलावाच्या जागेची पाहणी करण्यासाठी आलेले उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे आणि जलसंपदा विभागाच्या पथकासमोर या मुलाने आपले मत मांडले आहे.
या पाहणी दौऱ्यादरम्यान बाधित शेतकरी आणि महिलांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. आमच्यावर गोळ्या घाला,पण आम्ही आमच्या हक्काच्या जमिनी देणार नाही," अशी एकमुखी व आक्रमक घोषणा देत शेतकऱ्यांनी तलाव पूर्णपणे रद्द करण्याची मागणी लावून धरली.
तलावस्थळी संतापाचा बांध फुटल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी अधिकाऱ्यांची गाडी अडवून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.या गोंधळात एका वयोवृद्ध महिलेने चक्क उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांचे पाय धरत तलाव रद्द करण्याची आर्त विनवणी केली.हे हृदयद्रावक दृश्य पाहून तेथे उपस्थित असलेल्या अनेकांच्या डोळ्यात पाणी आले.गावकऱ्यांचा हा तीव्र जनक्षोभ आणि आक्रमक पवित्रा पाहता,"पुढील बैठक घेतल्याशिवाय कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी जमीन मोजणीसाठी गावात येणार नाही,"असे आश्वासन उपस्थित अधिकाऱ्यांना शेवटी द्यावे लागले.
प्रस्तावित सुकळी साठवण तलावामुळे परिसरातील सुकळी खुर्द, सुकळी बुद्रुक,दाताडा खुर्द आणि दाताडा बुद्रुक या चार गावांतील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली आहे.भूसंपादन कायदा अंतर्गत या चारही गावांतील शेतजमीन अधिग्रहित करण्याची प्रक्रिया प्रस्तावित असल्याने,शेकडो कुटुंबे भूमिहीन होण्याच्या उंबरठ्यावर उभी आहेत.
आंदोलनात सहभागी झालेल्या एका पीडित महिलेने भावनिक होत अधिकाऱ्यांना जाब विचारला,"माझे पती वारून १२ वर्षे झाली. मुलगा छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षण घेऊन गेल्या ५ वर्षांपासून बेरोजगार आहे. जर आमची एकमेव हक्काची शेतीच तलावात जाणार असेल, तर आम्ही जगायचे कसे सांगा साहेब?" केवळ आर्थिकच नव्हे, तर या प्रकल्पामुळे सामाजिक पेचही निर्माण होईल,अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. जर आमची सुपीक जमीन गेली,तर भविष्यात आमच्या मुलांना कोणी लग्न करायला मुलगी देखील देणार नाही,असा अत्यंत व्यावहारिक प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला.
चार गावांतील तीव्र जनक्षोभापुढे आणि आरपारच्या लढ्यापुढे प्रशासकीय पथकाला नमते घ्यावे लागले.अधिकाऱ्यांनी कायदा आणि नियमांचा हवाला देत शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला,मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.अधिकाऱ्यांनी तूर्तास मोजणी थांबवण्याचे आश्वासन दिले असले,तरी या तीव्र विरोधामुळे प्रकल्पावरून येत्या काळात मोठा संघर्ष पेटण्याची चिन्हे असून,प्रशासन आता भूसंपादन कायमचे थांबवणार का,याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
प्रस्तावित सुकळी साठवण तलावस्थळी शेतकऱ्यांचा बांध फुटल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी अधिकाऱ्यांची गाडी अडवून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.या गोंधळात एका वयोवृद्ध महिलेने चक्क उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांचे पाय धरत तलाव रद्द करण्याची आर्त विनवणी केली.हे ह्रदयद्रावक दृश्य पाहून तेथे उपस्थित असलेल्या अनेकांच्या डोळ्यात पाणी आले होते.