

Hingoli Zilla Parishad School
हट्ट : येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील दीर्घकाळ रिक्त असलेली शिक्षक व शिपाई पदे तातडीने भरण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयावर काढलेल्या धडक मोर्चाला अखेर यश मिळाले. आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने सर्व रिक्त शिक्षक पदांवर नियुक्त्या करत एका शिपायाचीही पदस्थापना केली.
यापूर्वी शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानुसार विज्ञान विषयाचे शिक्षक पी. एन. देशपांडे यांची बदली करण्यात आली होती. मात्र राजपत्रित मुख्याध्यापक, इंग्रजी विषय शिक्षक, विज्ञान विषय शिक्षक आणि शिपाई ही महत्त्वाची पदे दीर्घकाळ रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत होता. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता.
या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. ४) विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयावर धडक मोर्चा काढला. मोर्चाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला आणि अखेर रिक्त शिक्षक पदांवर नियुक्त्या तसेच शिपाई पदाची पदस्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आंदोलनाला यश मिळाल्यानंतर शिक्षण विभागाने तातडीने कार्यवाही करत सर्व नियुक्त्या पूर्ण केल्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी झालेल्या या लढ्याला यश मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. तसेच शिक्षणाधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत त्वरित निर्णय घेतल्याबद्दल विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पालकवर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकजुटीच्या बळावर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मिळालेल्या या यशाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले.