

आखाडा बाळापूर : पुढारी वृत्तसेवा कळमनुरी तालुक्यातील बहुतांश शेतकरी हे अल्पभूधारक असून कोणाकडे एक तर कोणाकडे दोनच एकर जमीन आहे. महामार्गासाठी त्यांच्या जमिनी संपादित केल्या तर त्यांनी खायचे काय आणि उदरनिर्वाह कसा करायचा? कर्मचाऱ्यांना विरोध नाही, तर शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे. त्यामुळे तुम्ही मोजणी न करता परत जा आणि शेतकऱ्यांचा या योजनेला तीव्र विरोध असल्याचा अहवाल वरिष्ठांना द्या, असा आक्रमक पवित्रा घेत आमदार संतोष बांगर आणि संतप्त शेतकऱ्यांनी कांडली व बऊर शिवारात मोजणीसाठी आलेल्या महसूल विभागाच्या पथकाला गुरुवारी पिटाळून लावले.
कळमनुरी तालुक्यातील अनेक गावांतून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग जात आहे. या महामार्गासाठी जमीन मोजणी आणि संपादनाचे काम महसूल विभागाने हाती घेतले आहे. मात्र, जमिनी गेल्यास उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्याने शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच या महामार्गासाठी एक इंचही जमीन न देण्याची ठाम भूमिका घेतली आहे.
गुरुवारी महसूल विभागाचे पथक कांडली आणि बऊर शिवारात जमिनीची मोजणी करण्यासाठी दाखल झाले होते. ही माहिती मिळताच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले. शेतकऱ्यांच्या सोबतीला आमदार संतोष बांगर, माजी सभापती संजय बोंढारे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अभय सावंत, माजी पंचायत समिती सदस्य राहुल पतंगे, विजय बोंढारे यांच्यासह अनेक स्थानिक नेते घटनास्थळी पोहोचले. यावेळी उपस्थितांनी जमीन मोजणी करू देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली. महसूल कर्मचाऱ्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु शेतकरी आणि लोकप्रतिनिधी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यामुळे पथकास रिकाम्या हाती परत जावे लागले.
आमदार संतोष बांगर यांनी महसूल कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. अल्पभूधारक शेतकऱ्यांची जमीन गेल्यास त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल, असे सांगत त्यांनी मोजणीची प्रक्रिया तातडीने थांबवण्यास सांगितले, लोकप्रतिनिधी आणि गावकऱ्यांचा तीव्र विरोध पाहता महसूल विभागाच्या पथकाने मोजणी न करताच तेथून काढता पाय घेतला-