file photo
file photo

हिंगोली : आई, वडीलासह मुलाचा अंत; उपचारासाठी निघाले होते कुटुंब

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील डिग्रसवाणी ते सिरसम मार्गावर दुचाकी खड्ड्यात पडल्याने झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील आई – वडिलासह मुलगा ठार झाला. आजारी वडिलांना आई आणि मुलगा दुचाकीवरून दवाखान्यात घेऊन जात असताना हा अपघात घडला. आकाश कुंडलिक जाधव, कलावती जाधव आणि कुंडलिक जाधव अशी मृतांची नावे आहेत.

डिग्रसवाणी येथील कुंडलीक जाधव हे शेती करतात. बुधवारी रात्री त्यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांचा मुलगा आकाश हा त्यांना उपचारासाठी सिरसम येथे घेऊन जात होता. यावेळी त्याची आई कलावतीबाई या देखील त्याच्या सोबत होत्या. रात्री सुमारे साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास तिघेही दुचाकी वाहनावरून सिरसमकडे निघाले होते. अंधारात वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे डिग्रस वाणी गावाच्या शिवारात त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात कोसळली. रात्री उशीरा आई वडिल व भाऊ घरी का आले नाही हे पाहण्यासाठी त्यांचा मुलगा महेंद्र दुचाकीवरून सिरसम येथे गेला होता. मात्र ते रुग्णालयात आलेच नसल्याचे समजले. त्यामुळे त्याने आकाशच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र रिंग होत असतांनाही फोन कोणीही घेत नव्हते. त्यामुळे त्याने शोधाशोध सुरु केली. दरम्यान, गुरूवारी सकाळी काही दुधविक्रेते सिरसमकडे जात असतांना खड्डयात दुचाकी व तिघेजण ठार झाल्याचे दिसून आले. त्यांनी खड्ड्यात जाऊन पाहिले असता ते तिघेही गावातील असल्याचे स्पष्ट झाले.

या घटनेची माहिती बासंबा पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास चवळी, जमादार नाना पोले, खंडेराय नरोटे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन तिघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले आहेत.

हेही वाचा : 

logo
Pudhari News
pudhari.news