तेलंगणात जाण्याची मागणी राजकीय स्वार्थापोटी : सीमावर्ती भागातील सरपंच, उपसरपंच बैठकीतील सूर

नांदेड
नांदेड
Published on
Updated on

धर्माबाद (नांदेड), पुढारी वृत्‍तसेवा : राजकीय स्तरावर तेलंगणा राज्यात सीमावर्ती भागातील गावे जोडण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र व तेलंगणा दोन्‍ही राज्यांतून होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज ( दि. ६ ) धर्माबाद शासकीय विश्रामगृह येथे सीमावर्ती भागातील सुमारे 22 गावच्या सरपंच, उपसरपंच यांची बैठक बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सह संपर्कप्रमुख आकाश रेडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीत उपस्थित सरपंच व त्यांच्या प्रतिनिधीनी आम्ही तेलंगणात जायचे नाही. ही मागणीच निरर्थक व राजकीय स्वार्थापोटी आहे. आम्ही महाराष्ट्र राज्यातच राहू. मात्र आमची विकास कामे झाली पाहिजेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. महाराष्‍ट्राचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार सीमावर्ती भागातील गावांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आले असल्याचे यावेळी सहसंपर्क प्रमुख आकाश रेडी यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी देखील ही मागणी झाली होती. त्यास राजकीय आधार मिळाला आणि त्यावेळी मंत्रालयात बैठक झाली व सुमारे 40 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते; पण प्रत्यक्षात ती कामे झालीच नाहीत. दरम्यान, पुन्हा एकादा ही मागणी जोर धरू लागली आहे. एका बाजूला तेलंगणातून व्यूहरचना आखली जात असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही गावे विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय करता येईल यासाठी सकारात्मकता दाखवली  आहे. आमच्या परिसरातील व गावातील मुलभूत विकास कामे करा आम्ही महाराष्ट्र राज्यातच राहणार आहोत तेलंगणात जाण्यासाठी उत्सुक नाही, असे सरपंच व उपसरपंचांनी प्रतिक्रिया दिली.

अखंड महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे

सरपंच संघटनेचा कार्यकाळ संपुष्टात आला व विद्यमान सरपंच किंवा उपसरपंच संघटना यांच्यावतीने अशी कोणतीही मागणी करण्यात आली नाही. आमच्या संघटनेचा आधार घेऊन जे कोणीही महाराष्ट्र सोडुन जाण्यासाठी तयार आहेत. ती कदाचित त्यांची व्यक्तीगत प्रतिक्रिया असेल. आम्ही विकासासाठी मागणी करीत आहोत. तेलंगणा राज्यात जाण्याची नाही. अखंड महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असेही या वेळी सांगण्यात आले.

तेलंगणाच्या राज्यसभेच्या खासदार निधीतून कामे करण्याचे आश्वासन दिले; पण प्रत्यक्षात त्या भागातील निवडणूक संपली की सोयीस्करपणे हा विषय बाजूला सारल्या गेला. त्या राज्यातील निवडणूक प्रचारासाठी आमच्या भावनांचा वापर केला जात असल्याचा आरोप देखील या वेळी करण्यात आला.

आमच्या मागण्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासन सक्षम

आमच्या मागण्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासन सक्षम आहे आम्ही हक्काने आमच्या सरकारला भांडू; पण तेलंगणा राज्यात जाण्यासाठी होत असलेल्या मागणीचे कदापी समर्थन करणार नाही. तेथील राज्यकर्त्यांनी आमच्या भावनांच; राजकीय भांडवल करू नये, अशी एकमुखी प्रतिक्रिया देखील उपस्थित सरपंच,उपसरपंच यांनी व्‍यक्‍त केली. मूळातच सरपंच संघटना अस्तित्वात नसताना ही मागणी होतेच कशी, असा सवालही यावेळी त्‍यांनी उपस्‍थित केला.

लवकरच मुख्‍यमंत्री घेणार बैठक

जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा पदमारेडी सतपलवार यांच्या नेतृत्वाखाली मागील काळात सुमारे 17 कोटी रुपयांची कामे करण्यात आली. विकासासाठी मुबलक निधीची आवश्यकता असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तो निधी उपलब्ध करून आणू, खासदार हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरपंच व मुख्यमंत्री यांची भेट व बैठक लवकरच होणार असून, त्या वेळी विकासासाठी आवश्यक त्या निधीची मागणी करण्यात येणार असल्याचे सहसंपर्क प्रमुख आकाश रेडी यांनी सांगितले.

हेही वाचा  :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news