पेंग्विनसारखे सूर मारून शिकार करणारे डायनासोर

पेंग्विनसारखे सूर मारून शिकार करणारे डायनासोर

न्यूयॉर्क : प्रागैतिहासिक काळातील डायनासोर या प्राण्याच्या अनेक प्रजाती होत्या. त्यामध्ये आकाशात उडणार्‍या डायनासोरपासून ते जलचर डायनासोरपर्यंत अनेक प्रकार होते. टी-रेक्ससारखे हिंसक, मांसाहारी डायनासोरपासून ते अवाढव्य आकाराच्या पण सौम्य व शाकाहारी अशा सॉरोपॉडस्पर्यंत अनेक प्रकारची विविधता डायनासोरमध्ये दिसून येते. आता संशोधकांनी अशा डायनासोरचे जीवाश्म शोधले आहे जो पाण्यात पोहत असे आणि पेंग्विनप्रमाणे पाण्यात सूर मारून माशांची शिकार करीत असे.

या डायनासोरची मान सध्याच्या बगळे किंवा हंसाप्रमाणे लांब व निमुळती होती. हे पक्षी पाण्यात डुबकी घेऊन शिकार करू शकतात. त्यासाठी त्यांना अशी मान उपयुक्त ठरते. 71 दशलक्ष ते 72 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या क्रेटाशियस काळातही अशी मान असणारे डायनासोर होते. हे डायनासोर सध्याच्या मंगोलियाच्या भागात वावरत असत. ते थेरोपॉडस्च्या वेगळ्या शाखेतील प्राणी होते.

दोन पायांचे आणि बहुतांशी मांसभक्षण करणारे हे जीव होते. त्यांची शरीररचना आणि पाण्यात डुबकी घेऊन शिकार करण्याची पद्धत सध्याच्या पेंग्विनसारखीच होती. त्यांच्या जीवाश्मामध्ये सांगाडा आणि जवळजवळ पूर्ण अशा कवटीचा समावेश होतो. मंगोलियाच्या गोबी वाळवंटातील बारुनगोयोट येथे हे जीवाश्म सापडले आहे. हे जीवाश्म मॅलार्ड डक या बदकाइतक्या आकाराचे आहे. त्याची हंसासारखी मान लक्ष वेधून घेणारी आहे. पायही एखाद्या फ्लीपरसारखे व पाण्यात पोहण्यासाठी मदत करणारे होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news