

कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा : भागवत एकादशीच्या आदल्या रात्री कोपरगाव शहर पोलिसांनी 10 गोवंश जनावरांची मुक्तता केली. दरम्यान, ही जनावरे कोकमठाण गोशाळेत सुखरूप रवाना करण्यात आली. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करुन, सुमारे 95 हजार किमतीचे गोवंश मुक्त केले आहे. या धडक कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असताना शहरासह परिसरात सर्रास गोवंश जनावरांची निर्दयीपणे वाहतूक व कत्तल होत असल्याचे गंभीर प्रकार वारंवार उघड होत आहेत.
कोपरगाव शहरातील सुभाषनगर भागात (शनिवार दि. 3 डिसेंबर ) रोजी रात्री सुमारास व 4 डिसेंबर 2022) च्या रात्री 1ः15 वाजेच्या सुमारास कत्तलीच्या उद्देशाने स्वतःजवळ बाळगलेल्या 10 गोवंश जनावरांची दोन वेगवेगळ्या ढिकाणी कारवाई करुन शहर पोलिसांनी मुक्तता केली. याप्रकरणी शहर पोलिस कॉन्स्टेबल विलास मासाळ यांच्या फिर्यादी वरून पोलिसांनी सुभाष नगर येथील पप्पू फकीर कुरेशी, रज्जाक इसाक कुरेशी व आयशा कॉलनी येथील मुज्जू हुसेन कुरेशी या तिघांविरोधात प्राण्यास निर्दयपणे वागवण्याचा अधिनियम 1960 चे कलम 11(1)(ह) व महाराष्ट्र प्राणीसंरक्षण कायद व सुधारणा अधिनियम 1995 चे कलम 5 (ब) 9 प्रमाणे गुन्हा दाखल केला. हे तिन्ही आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या कारवाईत पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, पोलिस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, पो. हे. कॉ. तिकोने, पो. ना. अर्जुन दारकुंडे, पो. काँ. मासाळ, गणेश मैंद आदी पोलिस या करवाईत सहभागी होते. या प्रकरणी पुढील तपास पो. नि. वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. सर्रास गोवंश जनावरांची निर्दयीपणे वाहतूक व कत्तल होत असल्याचे गंभीर प्रकार वारंवार उघड. गोवंश जनावरे संगोपनासाठी कोकमठाण येथील गोकुलधाम गौरक्षा केंद्रात सुखरूप पाठविले.