

Ubatha's Thombre wins for the fourth time
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीच्या निवडणुकीत बहुरंगी राजकीय चित्र पाहायला मिळाले असून, भाजपने ७, शिवसेनेने ६, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ४ जागांवर विजय मिळवला आहे. यामध्ये उबाठा पक्षाच्या गाढेजळगाव गणातील उमेदवार गयाबाई शंकरराव ठोंबरे यांनी सलग चौथ्यांदा विजय मिळवत विजयाचा चौकार लगावला आहे.
गाढेजळगाव गणात ठोंबरे यांना ४ हजार २२५ मते मिळाली. त्यांनी प्रतिस्पर्धी वैशाली ठोंबरे यांचा ४७५ मतांनी पराभव करत पुन्हा एकदा आपली पकड मजबूत असल्याचे सिद्ध केले.
या गणात डॉ. दीपाली अमर देशमुख, छाया किडवे, भाग्यश्री कोरडे व संगीता भोसले यांना पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान, गोलटगाव गणातून प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुष्पाबाई अंकुश साळुंके या विजयी झाल्या. त्यांच्या रूपाने प्रहारने प्रथमच पंचायत समितीत प्रवेश केला आहे. त्यांनी रुक्मिणी खलसे व यमुनाबाई घोंगडे यांचा पराभव केला.
करमाड गणात काँग्रेसच्या गीता कोरडे यांनी भाजपाच्या जिजा कोरडे यांना धूळ चारली. वरूड काझी गणात भाजपाचे शेखर दांडगे यांनी काँग्रेसचे भास्कर मुरमे यांचा पराभव केला. पळशी गणातून निर्मला पळसकर, सावंगी गणातून सुमन चव्हाण, तर दौलताबाद गणातून भाजपाचे सर्जेराव चव्हाण विजयी झाले.
एकूणच पंचायत समिती निवडणुकीत पारंपरिक पक्षांसह नव्या समीकरणांची नोंद दिसून आली असून, काही ठिकाणी स्थानिक नेतृत्वाचा प्रभाव निर्णायक ठरल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.