

After the Municipal Corporation, BJP's charisma is also present in the zp election
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
महापालिका निवडणुकीत ११५ पैकी तब्बल ५७जागांवर भाजपने विजय मिळविला. या घवघवीत यशानंतर जिल्हा परिषदेतही भाजपचाच करिश्मा कायम राहिला असून, ६३ पैकी तब्बल २३ गटांत यश मिळविले. विशेष म्हणजे गेल्यावेळीही भाजपला २३ जागांवरच यश मिळाले होते, परंतु यंदा भाजपला दोन ठिकाणी भाजप पुरस्कृत उमेदवार निवडून आणण्यात यश आल्याने भाजपकडे २५ सदस्य झाले आहेत.
महापालिका निवडणूक युतीमध्ये लढू नये, असा नारा सर्वप्रथम भाजपमधून निघाला होता, परंतु त्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदे शानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी युतीत निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली. सेनेसोबत जागा वाटपाच्या बैठका घेत शांततेत चर्चा केली. परंतु सेनेत अंतर्गत कलह वाढला त्यात युतीत कमी जागा मिळत असल्याने स्वबळाचा नारा दिला. त्यामुळे ऐनवेळी युती तुटल्याने सेना-भाजप स्वबळावर लढले. यात भाजपने ५७ ठिकाणी यश मिळविले.
या यशानंतर जिल्हा परिषद निवडणूक युतीत लढण्यासाठी पुन्हा दोन्ही पक्ष एकत्र आले. सिल्लोड-सोयगावचे १२ गट वगळून युती करण्यात आली. त्यात ५१ पैकी भाजपला २६, तर उर्वरित २५ लढणार, असे जाहीर केले. दरम्यान, गट-गणाचे वाटप झाल्यानंतर पुन्हा शिवसेना शिंदे गटातून विरोध झाला. ऐनवेळी सेनेने भाजप लढवत असलेल्या १७ जागांवर आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले.
त्यानंतर भाजपनेही ४ उमेदवारांना एबी फॉर्म दिले. परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वेळेतही युतीधर्म पाळला न गेल्याने भाजपने आपल्या अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत म्हणून जाहीर केले. मात्र एवढे होऊनही शिवसेनेला केवळ २१ जागांवरच यश मिळविता आले. तर भाजपने गेल्यावेळीप्रमाणेच २३ जागा तर मिळविल्याच. शिवाय दोन अतिरिक्त जागांवर पुरस्कृत उमेदवार निवडून आणण्यात यश आले. महापालिकेपाठोपाठ जिल्हा परिषदेतील या यशानंतर आता जिल्ह्यात युतीमध्ये भाजपच मोठा भाऊ बनला आहे.