Trains Fully Booked: Many on Waiting List
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा हंगाम सुरू होताच सर्वच मार्गावर प्रवाशांची संख्या वाढली आहे. पर्यटन, धार्मिक स्थळांना भेटी तसेच नातेवाईकांकडे जाणार्यांची संख्या वाढल्याने रेल्वे हाऊसफुल्ल झाल्या आहेत. तर अनेकांनी अडव्हान्स बुकिंग करूनही वेटिंगवर राहण्याची वेळ आली आहे. ही संधी साधून खासगी बसचालक विकएन्डला मनमानी दर आकारत असल्याने प्रवाशांची मोठी कोंडी होत आहे.
मुंबई, चेन्नई, शिर्डी, पुणे, हैदराबाद, तिरुपती, द्वारका, जयपूर यांसारख्या प्रमुख ठिकाणांकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी वाढली आहे. अनेक रेल्वेचे आरक्षण फुल्ल झाल्याने अनेक जण वेटिंगवर आहेत. काही मार्गांवर तर वेटिंग लिस्ट शंभरच्या पुढे गेल्याने अनेकांनी तिकीट कन्फर्म होण्याची आशा सोडली आहे.
एकीकडे एसटीला देखील गर्दी वाढल्याने अनेकांनी रेल्-वेचा पर्याय निवडला आहे. त्यात एसटीच्या भाड्यात दहा टक्क्यांची वाढ झाली आहे. तर काही अत्यावश्यक प्रवासांवर निघालेल्या प्रवाशांना मात्र खासगी बसने प्रवास करावा लागत आहे, तोही त्यांच्या मनमानी दरांनुसार त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबईला जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने रेल्वेला वेटिंग वाढली आहे. जनशताब्दी, तपोवन एक्सप्रेस, नंदीग्राम, देवगिरी आदी गाड्यांना मोठ्या प्रमाणांत वेटिंग आहे. वाढत्या वेटिंगमुळे अनेकांनी एसटी किंवा खासगी बसकडे मोर्चा वळवला आहे. अचानक प्रवासी वाढल्याने खासगी बसचालकांनी शनिवार आणि रविवार हे दोन दिवस मुंबईसाठी २ हजार ते अडीच हजारांपर्यंत दर वाढवला आहे. अनेक जण नाविलाजस्तव जादा रक्कम देऊन प्रवास करत आहेत. मनमानी दरवाढीची बाब आरटीओनी गांभीर्याने घ्यावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
धार्मिक पर्यटनसाठीही रेल्वेला गर्दी
सुट्ट्या लागताच देवदर्शनाचे पर्यटन वाढले आहे. त्यामुळे धार्मिक स्थळी जाणाऱ्यां रेल्वेला सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. शिर्डी, तिरुपती, रामेश्वरम, द्वारकाकडे जाणाऱ्या रेल्वेही फुल्ल झाल्या आहेत. साईनगर शिर्डी एक्स्प्रेस ८ जूनपर्यंत फुल्ल आहे. तसेच ओखा रामेश्वरम एक्स्प्रेस, तिरुपती, एक्स्प्रेसला ७ जूनपर्यंत वेटिंग आहेत.