

छत्रपती संभाजीनगर : लडाखचे ज्येष्ठ पर्यावरणवादी, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू केलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सोमवारी (दि.२०) शहरातील क्रांती चौकात विद्यार्थी, संशोधक, शिक्षक, वकील आणि विविध सामाजिक व विद्यार्थी संघटनांनी सरकारविरोधात तीन तास ठिय्या आंदोलन केले. पावसाची रिपरिप सुरू असतानाही घोषणाबाजी, पथनाट्य, पोवाडे, रॅप आणि जनजागृतीपर गीतांद्वारे आंदोलकांनी लोकशाही आणि घटनात्मक मूल्यांच्या समर्थनार्थ आवाज बुलंद करत शिक्षणमंत्री, पंतप्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी एकमुखी मागणी केली.
दुपारी १२ ते ३ या वेळेत झालेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांनी घोषणाबाजीसह सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला. इन्कलाब जिंदाबाद, जय भीम, लढेंगे, जितेंगे अशा घोषणांनी क्रांती चौक परिसर दणाणून गेला. पर्यावरण, शिक्षण आणि संविधानिक हक्काच्या संरक्षणासाठी लढणाऱ्यांच्या पाठीशी विद्यार्थी समाज कायम उभा राहील, असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.
आंदोलनात महापुरुषांच्या इतिहासावर आधारित पोवाडे, देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणारे पथनाट्य, रॅप आणि जनजागृतीपर गीते सादर करण्यात आली. विविध कलाप्रकारांतून संविधान, लोकशाही आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. काही काळ आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलनही केले.
संदेश फलकांनी वेधले लक्ष
आंदोलनकर्त्यांच्या हातात आय सपोर्ट सोनम सर, संविधान जिंदाबाद, दादागिरी नाही चालणार, हुकूमशाही नाही चालणार अशा घोषणांचे फलक झळकत होते. शिक्षण, लोकशाही आणि पर्यावरण संरक्षणाच्या समर्थनार्थ विविध संदेश देणारे फलक तसेच अनेक विद्यार्थ्यांच्या हातातील तिरंगा ध्वजही लक्षवेधी ठरला.
विविध संघटनांचा सहभाग
या आंदोलनात संशोधक विद्यार्थी कृती समिती, मराठवाडा शिवप्रेमी वकील मित्र संयोजन समितीसह विविध विद्यार्थी, वंचित बहुजन आघाडी, आंबेडकरी विचाराच्या संघटना, एसएफआय, सामाजिक आणि वकील संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदविला. विविध क्षेत्रांतील प्रतिनिधी उपस्थित राहिल्याने आंदोलनाला व्यापक प्रतिसाद मिळाला.