Chhatrapati Sambhajinagar District Bank : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर शिदे गटाचे आमदार भुमरे

उपाध्यक्षपदी भाजपाचे शेळके यांची बिनविरोध निवड
Cooperative bank chairman election
जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आमदार विलास भुमरे आणि उपाध्यक्ष रामराव शेळके यांची निवड घोषित होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी दोघांना उचलून घेत आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केला. (छाया : बाळू देशमुख)
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी महायुतीमध्येच लागलेल्या रस्सीखेचीत अपेक्षेप्रमाणे अखेर शिवसेना शिंदे गटानेच बाजी मारली. अध्यक्षपदी शिंदे गटाचे आमदार विलास भुमरे यांची निवड झाली, तर उपाध्यक्षपदी भाजपचे रामराव शेळके विराजमान झाले. दोन्ही पदांसाठी एक-एकच अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी समृत जाधव यांनी सोमवारी घोषित केले. दरम्यान, निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत ढोल-ताशांच्या गजरात एकच जल्लोष केला.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलचे २० पैकी १९ संचालक निवडून आले. यात पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, आ. अनुराधा चव्हाण, रमेश बोरणारे, विलास भुमरे, रंजना जाधव यांच्यासह ठाकरे सेनेचे आ. अंबादास दानवे यांचाही समावेश आहे. तर मविआच्या विरोधी भूमिपुत्र शेतकरी सहकार बँक बचाव पॅनलचे खा. डॉ. कल्याण काळे हे एकमेव संचालक आहेत.

Cooperative bank chairman election
Beed News : माजलगावच्या 'गुलजार-ए-रजा' ट्रस्टचे बार्शीतील 'अल हलिमी' ट्रस्टसोबत आर्थिक संबंध

महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही अध्यक्षपदाच्या महत्त्वाकांक्षेमुळे भाजप आणि शिवसेनेत मोठी रस्सीखेच सुरू होती. शेवटी वरिष्ठ नेत्यांनी यावर तोडगा काढत पहिली दोन वर्षे अध्यक्षपद शिवसेनेकडे, तर उपाध्यक्षपद भाजपकडे असेल, असा फॉर्म्युला निश्चित झाला.

अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. अध्यक्षपदासाठी आ. भुमरे यांचा एकमेव, तर उपाध्यक्षपदासाठी भाजपचे शेळके यांचा एकच अर्ज दाखल झाला. भुमरे यांच्या अर्जावर सुचक म्हणून पालकमंत्री शिरसाट, तर अनुमोदक म्हणून मंत्री सावे यांनी स्वाक्षऱ्या केल्या, तर शेळके यांच्या अर्जावर सूचक म्हणून अर्जुन पाटील आणि अनुमोदक म्हणून आमदार बोरणारे यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

छाननीत दोन्ही अर्ज वैध ठरल्याने अध्यक्षपदासाठी भुमरे, तर उपाध्यक्षपदासाठी शेळके यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाधव यांनी घोषित केले. यावेळी सर्व संचालक मंडळासह खा. संदीपान भुमरे, आ. अब्दुल सत्तार, सतीश चव्हाण, प्रशांत बंब यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Cooperative bank chairman election
Hingoli NEET protest : हिंगोलीत शिक्षणमंत्र्यांच्या पुतळा दहनावरून राडा

अशी आहे जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती

  • बँकेच्या शाखा - १३८

  • भाग भांडवल - २० कोटी ५१ लाख रुपये

  • ठेवी - ३ हजार ४९३ कोटी २८ लाख रुपये

  • गुंतवणूक - १ हजार ७९३ कोटी ८४ लाख रु.

  • कर्जबाकी १ हजार ९९७ कोटी ४७ लाख

  • ग्रॉस एनपीए - ५१६ कोटी ८७ लाख रुपये

  • ढोबळ नफा - ७० कोटी ३६ लाख रुपये

महायुतीत दोन-दोन एक वर्षाचा फार्म्युला बँकेची निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढवत २० पैकी १९ जागा जिंकल्या. सर्वांच्या संमतीनुसार अध्यक्षपद पहिले दोन वर्षे शिवसेनेकडे, तर उपाध्यक्षपद भाजपकडे राहील. त्यापुढील दोन वर्षे अध्यक्षपद भाजपकडे आणि उपाध्यक्षपद शिवसेनेकडे राहणार असून, एक वर्ष अध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला असेल, असा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे.

अतुल सावे, बँकेचे संचालक तथा राज्याचे मंत्री

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडण्यास प्राधान्य जिल्हा बँक अधिक नावारूपास यावी यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शेतकऱ्यांची ही बँक आहे. इथे शेतकऱ्यांचे हित जोपासणे आणि त्यांच्या अडीअडचणी बँकेच्या माध्यमातून सोडविण्यावर आमचा भर राहणार आहे.

आ. विलास भुमरे, नवनिर्वाचित अध्यक्ष, जिल्हा बँक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news