

Sambhajinagar News: 1.5 Lakh Customers in the City Awaiting Gas Supply
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात मागील पंधरा दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. बुकिंग करूनही दहा-दहा दिवस ग्राहकांना सिलिंडर मिळत नसल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीतही बुकिंग केलेले तब्बल १ लाख ४५ हजार ग्राहक गॅस सिलिंडरच्या प्रतीक्षेत आहेत. तर दिवसाला शहरात २० हजार गॅस सिलिंडरचाच पुरवठा होत आहे. त्यामुळे सिलिंडरचा वेटिंगचा कालावधी दिवसेंदिवस वाढत आहे.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सोमवारी शहरातील गॅस एजन्सीचालक आणि गॅस कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, गॅस उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी नितीन बजाज, शुभम चौहान तसेच रेखा केदारे, माधुरी कदम, सविता काकडे तसेच जिल्ह्यातील अन्य गॅस वितरक उपस्थित होते.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर बुकिंग वाढले असून, दिलेल्या मुदतीत लोकांना सिलिंडर घरपोच दिले जात आहे. मार्च, एप्रिल महिन्यात असणाऱ्या सरासरी पुरवठ्या इतकीच मागणी होत असल्याचे कंपनीचे प्रतिनिधींनी निदर्शनास आणले. गॅसचे बुकिंग ऑनलाईनच होत आहे. मात्र अनेक लोक सिलिंडर संपल्यावर थेट सिलिंडर घेऊनच एजन्सीवर गर्दी करत आहेत, असे एजन्सीधारकांतर्फे सांगण्यात आले.
शहरात सद्यस्थितीत तिन्ही गॅस कंपन्यांच्या सर्व एजन्सींकडे १ लाख ४५ हजार ग्राहकांनी बुकिंग केलेली असून, त्यांना सिलिडरची प्रतीक्षा असल्याची माहिती यावेळी समोर आली. तर शहरात पूर्वीप्रमाणे दिवसाला २० हजार गॅस सिलिंडरचा पुरवठा होतो आहे. त्यामुळे गॅस कंपन्यांनी अधिक गॅस सिलिंडरउपलब्ध करून द्यावेत, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
ई-केवायसी घरी जाऊनच करा
कोणताही ग्राहक सिलिंडर घेऊन एजन्सीवर येता कामा नये. ग्राहकाने बुकिंग केल्यानंतर त्याला घरपोच डिलिव्हरीद्वारेच सिलिंडर पोहोचविणे बंधनकारक आहे. सद्यस्थितीत नवीन गॅस जोडणीचे काम बंद आहे. तसेच काही ग्राहकांची ई-केवायसी बाकी आहे. ते काम ग्राहक ऑनलाईन करू शकतात. किंवा सिलिंडर द्यायला घरी गेल्यावर कर्मचाऱ्यांनी ते काम करावे, असेही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.
ग्राहकांना गॅस वितरण घरपोच करावे : जिल्हाधिकारी
घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत होऊन स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी कठोर उपाययोजना राबवा. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाला गॅस सिलिंडर हे घरपोच डिलिव्हरीद्वारेच पोहोचवावे, एजन्सींवर ग्राहकांच्या रांगा लागता कामा नयेत, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
गॅस डिलीव्हरीसाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी
शहरात एजन्सींसमोर ग्राहकांच्या रांगा आहेत. तर दुसरीकडे घरपोच डिलेव्हरीसाठी घेऊन गेलेल्या डिलेव्हरी बॉयला मारहाण होण्याची तसेच धमकावून सिलिंडर मागण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी डिलिव्हरी वाहनाला पोलिस बंदोबस्त असणे आवश्यक आहे, अशी मागणी गॅस एजन्सीचालकांनी बैठकीत केली. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना तातडीने निर्देशित केले. गॅस सिलिंडर ग्राहकापर्यंत नेणाऱ्या वाहनांना पोलिस पेट्रोलिंग देणे आवश्यक करावे, असे त्यांनी सांगितले.