

पूर्णा : शहरातील पूर्णा गॅस एजन्सीवर मागील काही दिवसांपासून इंडेन गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद असल्याने घरगुती ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्यामुळे ग्राहकांना एजन्सीवर वारंवार चकरा माराव्या लागत असून गृहिणींसमोर स्वयंपाकाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आखाती भागातील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठा साखळीत अडथळे निर्माण झाले असून त्यामुळे सिलेंडरचा पुरवठा खंडित झाल्याचे सांगितले जात आहे. परिणामी बुकिंग केलेल्या ग्राहकांनाही वेळेवर गॅस सिलेंडर मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. घरातील सिलेंडरमधील गॅस संपल्यामुळे अनेक कुटुंबांना स्वयंपाकासाठी आरा मशिनवरून जळण लाकूड विकत आणून चुली पेटवण्याची वेळ आली आहे.
याशिवाय अलीकडेच प्रति सिलेंडर सुमारे ६० रुपयांची दरवाढ करण्यात आल्याने घरगुती बजेटही कोलमडले आहे. दुसरीकडे व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठाही विस्कळीत झाल्याने काही हॉटेल व्यावसायिकांना चुलीवर स्वयंपाक करून पदार्थ तयार करावे लागत आहेत.
दरम्यान, ८४५४९५५५५५ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन गॅस बुकिंग करण्याची सुविधाही व्यवस्थित कार्यरत नसल्याची तक्रार ग्राहकांकडून करण्यात येत आहे. अनेकदा प्रयत्न केल्यानंतरच बुकिंग होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
याबाबत एजन्सीच्या व्यवस्थापकांना विचारले असता, वरिष्ठ गॅस पुरवठादाराकडून सिलेंडरचा पुरवठा होत नसल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. पुरवठा उपलब्ध होताच बुकिंगधारक ग्राहकांना सिलेंडर वितरित केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे अनेक घरांमध्ये पुन्हा लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. मात्र चुलीवर स्वयंपाक करण्याची सवय कमी झाल्याने चुल पेटवणे, ज्वाला कायम ठेवणे आणि धुराचा सामना करणे अशा अनेक अडचणी गृहिणींना भेडसावत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.