

Sambhajinagar Meeting of the Kakade family from across the state
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा सरदार सूर्याजी काकडे हे लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहवासात राहिले आणि आपल्या जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत स्वराज्यासाठी लढले. त्यामुळे आपला भूतकाळ एवढा दैदीप्यमान आणि उज्ज्वल असेल, तर अत्यंत उत्कृष्ट व हव्याहव्याशा वाटणाऱ्या भविष्यकाळाची अपेक्षा आपण निश्चितच करू शकतो, असे गौरवोद्वार महाराष्ट्र राज्य कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आयएएस अशोक काकडे यांनी काढले. अखंड मराठा काकडे परिवाराच्या पहिल्या राज्यव्यापी ऐतिहासिक बैठकीत ते बोलत होते. शहरातील तिरुमला कार्यालयात रविवारी (दि.५) झालेल्या या बैठकीस राज्यभरातून सुमारे दीड ते दोन हजार काकडे परिवारातील मान्यवरांनी उपस्थिती लावली.
यावेळी संभाजीनगरचे विजय काकडे, पुण्याचे विजय काकडे, उद्योजक सुरेंद्र काकडे, प्रा. सीताराम काकडे, उद्योजक दत्ता काकडे, संभाजीनगर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा संपादक विनोद काकडे, मेस्टा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष संजय तायडे पाटील, माजी शिक्षण अधिकारी भाऊसाहेब काकडे, पंढरीनाथ काकडे, विकास काकडे, अरुण काकडे, जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे, करंजा लाडचे नगराध्यक्ष संजय काकडे, शेतकरी नेते धनंजय काकडे, निखिल काकडे, रेखा काकडे, अक्षदा काकडे आणि पूजा काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आयएएस काकडे यांनी सारथी संस्थेच्या विविध योजनांचा मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभघ्यावा, असे आवाहन करत काकडे परिवाराच्या सर्वांगीण विकासासाठी काकडे परिवार विकास मंच स्थापन करण्याची सूचनाही केली. दरम्यान, बैठकीत पांघारे ता. पुरंदर, जि. पुणे येथील सरदार सूर्याजी काकडे यांच्या समाधीस्थळाचा राष्ट्रीय स्मारक म्हणून विकास करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात नोंदणी व स्वागताने झाली. त्यानंतर उद्घाटन, मुख्य परिसंवाद, स्नेहभोजन, मुक्त संवाद आणि महत्त्वपूर्ण निर्णयांचे सत्र पार पडले. कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल उद्योजक सुरेंद्र काकडे यांनी सरदार विजय काकडे यांचे विशेष कौतुक केले.
बैठकीत विविध उपक्रमांची घोषणा
बैठकीत काकडे बिझनेस फोरमची स्थापना, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व करिअर मार्गदर्शन, आपत्कालीन कौटुंबिक मदत निधी, वैवाहिक समन्वय व्यासपीठ तसेच सरदार सूर्याजी काकडे यांच्या इतिहासाचे डिजिटल व पुस्तकी दस्तऐवजीकरण या उपक्रमांची घोषणा करण्यात आली.
काकडे परिवार जागतिक स्तरावर पोहोचावा !
बैठकीत मराठा समाज आणि काकडे परिवार जागतिक स्तरावर पोहोचला पाहिजे. प्रत्येकाने छोटा अथवा मोठा व्यवसाय करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे. तसेच काकडे परिवारातील शेवटच्या घटकापर्यंत संघटनेचे कार्य पोहोचवावे, असा एकमुखी सूर उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.