Local Body Constituency Election : लातूर-बीड-धाराशिव मतदारसंघ : पुन्हा रंगणार प्रतिष्ठेची रणधुमाळी

फडणवीसांच्या ‌‘त्या‌’ ऐतिहासिक खेळीची अजूनही चर्चा; यंदा भाजप मजबूत, पण बंडखोरी ठरू शकते गेमचेंजर
Local Body Constituency Election
लातूर-बीड-धाराशिव मतदारसंघ : पुन्हा रंगणार प्रतिष्ठेची रणधुमाळीpudhari photo
Published on
Updated on

शशी केवडकर

बीड : लातूर-बीड-धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर होताच मराठवाड्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ, महायुती-महाविकास आघाडीतील अंतर्गत समीकरणे, संभाव्य बंडखोरी आणि उमेदवारीसाठी सुरू असलेली रस्सीखेच यामुळे ही निवडणूक पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू ठरण्याची चिन्हे आहेत.

या मतदारसंघाची चर्चा होताना मागील निवडणुकीचा थरार आजही राजकीय वर्तुळात रंगतदार किस्स्यांसह सांगितला जातो. भाजपचे तत्कालीन विरोधी पक्षनेते व आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या वेळी एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेला राजकीय धक्का अजूनही विस्मरणात गेलेला नाही.

Local Body Constituency Election
Rajya Sabha elections 2026 | महाराष्ट्रातून राज्यसभेवर 7 जणांना संधी; शरद पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष

निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे राज्यभर या निवडणुकीची चर्चा झाली होती.त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आजचे लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड हे प्रमुख चेहरा म्हणून पुढे आले होते. त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र अर्ज माघारी घेण्याच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि संपूर्ण राजकीय समीकरणच बदलले. तेव्हा अपक्ष म्हणून निवडणुकीस उभारलेले बांधकाम व्यावसाईक अशोक जगदाळे यांना राष्ट्रवादीने आपला पाठिंबा दिला होता.

या अनपेक्षित निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी कोंडी झाली होती. अखेरीस पक्षाला अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देत निवडणूक लढवावी लागली. मात्र सुरेश धस यांनी आखलेल्या रणनीतीसमोर विरोधकांचे गणित कोलमडले आणि भाजपने मोठ्या फरकाने विजय मिळवत या मतदारसंघावर आपला झेंडा फडकावला.त्या निवडणुकीने मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात ‌‘शेवटच्या क्षणी पलटी होणाऱ्या समीकरणां‌’ची नवी परंपराच निर्माण केली होती. त्यामुळे यंदाची निवडणूक तितकीच रंजक होणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

राजकारणाची दिशा ठरवणारी निवडणूक

लातूर-बीड-धाराशिव मतदारसंघाची ही निवडणूक केवळ एका जागेपुरती मर्यादित नसून मराठवाड्यातील आगामी राजकीय समीकरणांची चाचणी मानली जात आहे. महायुतीची ताकद, महाविकास आघाडीची एकजूट आणि स्थानिक पातळीवरील नाराजी यांची खरी परीक्षा या निवडणुकीत होणार आहे.मागील निवडणुकीत शेवटच्या क्षणी बदललेल्या समीकरणांनी राज्याचे लक्ष वेधले होते. यंदाही उमेदवारीपासून मतदानापर्यंत प्रत्येक टप्प्यावर नवे राजकीय ट्विस्ट पाहायला मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

भाजपकडून दत्ता कुलकर्णी यांचे नाव आघाडीवर

यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून धाराशिवचे प्रसिद्ध उद्योजक तथा भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांचे नाव प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत आहे. धाराशिव जिल्ह्यातील संघटनात्मक पकड, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाव आणि महायुतीतील संपर्क या जोरावर त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.दुसरीकडे महाविकास आघाडीत मात्र अद्याप स्पष्टता दिसून येत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये उमेदवारी-वरून मोठा विसंवाद असल्याचे बोलले जात आहे. कोणत्या पक्षाच्या वाट्याला ही जागा जाणार आणि त्यानंतर उर्वरित पक्ष कितपत प्रामाणिकपणे काम करणार, हा निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.

Local Body Constituency Election
Rajya Sabha Election Maharashtra: मविआसमोर सहमतीच्या उमेदवाराचे मोठे आव्हान

स्थानिक स्वराज्य संस्थांतील बलाबल भाजपच्या बाजूने

सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे पाहिले तर या मतदारसंघात भाजपचे पारडे जड दिसत आहे. लातूर जिल्ह्यात महानगरपालिका वगळता ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे मोठे संख्याबळ आहे. धाराशिव जिल्ह्यात तर बहुतांश ठिकाणी भाजपचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते. बीड जिल्ह्यात भाजप आणि अजित पवार गटाचे सदस्य मोठ्या प्रमाणावर निवडून आले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील गणित विचारात घेतल्यास महायुतीकडे स्पष्ट आघाडी असल्याचे चित्र आहे. याउलट विरोधकांकडे एकसंध नेतृत्वाचा अभाव, उमेदवारीवर मतभेद आणि सदस्यसंख्या कमी असल्याने सध्यातरी निवडणुकीत भाजपचा उमेदवार मजबूत स्थितीत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

‌‘बंडखोरी‌’ ठरू शकते निर्णायक

तथापि या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा मुद्दा म्हणजे संभाव्य बंडखोरी. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढत असल्याने उमेदवारी न मिळाल्यास नाराजी उफाळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अजित पवार गटातील स्थानिक पातळीवरील नेतेदेखील या जागेवर दावा सांगण्याची शक्यता नाकारता येत नाही. महायुतीतील अंतर्गत असंतोष वाढल्यास त्याचा थेट परिणाम मतदानावर होऊ शकतो. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये वैयक्तिक संबंध, स्थानिक समीकरणे आणि नाराज गटाची भूमिका अनेकदा निर्णायक ठरत असते. त्यामुळे ही निवडणूक केवळ पक्षीय ताकदीवर नव्हे तर अंतर्गत व्यवस्थापनावरही अवलंबून राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news