Krantisinh Nana Patil : साताऱ्याचे क्रांतिसिंह होते बीडचे खासदार

पाटोद्यात खोली, दोन अंगरखे, दोन धोतर, पांघरायला एक घोंगडी..
Krantisinh Nana Patil
Krantisinh Nana Patil : साताऱ्याचे क्रांतिसिंह होते बीडचे खासदारFile Photo
Published on
Updated on

Krantisinh Nana Patil of Satara was the MP of Beed

उमेश काळे

छत्रपती संभाजीनगर : ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणारे साताऱ्याचे क्रांतिसिंह नाना पाटील हे बीड जिल्ह्याचे खासदार होते. 1967 साली झालेल्या निवडणुकीत त्यांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाने बीडमधून उमेदवारी दिली होती.

Krantisinh Nana Patil
Minimum Temperature Decrease : थंडीचा जोर आणखी वाढणार, किमान तापमानात होणार घट

नानासाहेब हे काँग्रेसी विचारांचे. नंतर शेकाप व कालांतरांने भाकपमध्ये प्रवेश केला. 67 च्या निवडणुकत ते साताऱ्यातून उभे राहण्यासाठी निवडणुकीची तयारी करीत होते, पण त्यांना पक्षाने बीडमध्ये उभे राहण्यास सांगितले. पक्षादेश मान्य करीत त्यांनी बीडकडे कूच केली व खासदार म्हणून उल्लेखनीय काम केले. मराठीत भाषण करणारे पहिले खासदार अशी त्यांची सांसदीय इतिहासात नोंद आहे.

1967 च्या निवडणुकीत नानासाहेबांना 1 लाख 25 हजार 216 मते मिळाली. त्यांच्या विरोधात उभे असणारे काँग्रेसचे उमेदवार द्वारकादास मंत्री यांना 1 लाख 11 हजार 119 मते पडली. जनसंघाचे एन. के. मानधने यांना 25 हजार मतांवर समाधान मानावे लागले.

Krantisinh Nana Patil
Jayakwadi Bird Sanctuary : यंदाही विदेशी पक्ष्यांचे आगमन लांबले

1967 ला त्यांनी बीड येथून उभे राहण्याचा आदेश मिळाला. तेव्हा त्यांच्याकडे बीड येथे जाण्यासाठी पैसे नव्हते. साताऱ्याचे कॉ. नारायण माने यांनी त्यांचे तिकिट काढले. ते सुद्धा नानांसोबत बीड येथे गेले. बीडला गेल्यावर क्रांतिसिंहांनी पैशाची अडचण सांगितल्यावर कार्यकर्त्यांनी वर्गणी जमा करून डिपॉझिट रक्कम भरली व त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले. या जिल्ह्यात असणारा कम्युनिस्टांचा प्रभाव, क्रांतिसिंहाचे वलय यामुळे ते निवडून आले आणि दुसऱ्या जिल्ह्यातील क्रांतिकारी नेत्याला बीडकरांनी लोकसभेत पाठविले.

पाटोद्यात ठोकला मुक्काम

खासदार झाल्यानंतर नानासाहेब पाटील यांनी पहिल्याच भाषणात पुढील पाच वर्ष आपण बीडमधून हालणार नाही, असा शब्द दिला. पाटोदा येथील ग्रामपंचायतीत आपला मुक्काम ठोकला आणि तेथूनच ते जनतेचे प्रश्न सोडवू लागले. पाटोद्यातील त्यांचे सहकारी भोजनाची व्यवस्था करीत. एक पत्र्याची पेटी, त्यात आईचा फोटो, दोन अंगरखे, दोन धोतर आणि पांघरायला एक घोंगडी हेच त्यांचे साहित्य होते. क्रांतिसिंहांचे पाटोदा येथील सहकारी सय्यद इक्बाल (पेंटर) संभाजीनगरात एका संमेलनासाठी आले होते, तेव्हा त्यांनी नानांच्या काही आठवणी सांगितल्या.

Krantisinh Nana Patil
शासकीय कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्याची मागणी

त्यांची पहिली सभा बीडच्या किल्ला मैदानावर झाली. या सभेत त्यांनी शेतकरी, दुष्काळाचे प्रश्न आपल्या खास रांगड्या शैलीत मांडले. त्यामुळे लोक प्रभावित झाले. नाना खासदार झाले तर साताऱ्यात परत जातील असा प्रचार काँग्रेसने केला होता. त्याकडे मतदारांनी फारसे लक्ष दिले नाही. नानांचे जेवण अगदी साधे होते. भाकरीबरोबर भाजी किंवा चटणी. ग्रामपंचायतीजवळ थंड पाण्याने स्नान करीत असत. अंबाजोगाई येथे वैद्यकीय महाविद्यालय आणि परळी- बीड- नगर मार्गाची सर्वप्रथ मागणी त्यांनीच केली होती. संसद अधिवेशनात सहभागी होण्यासाठी ते बसने संभाजीनगरला जात, तेथून मनमाडमार्गे दिल्लीला रेल्वेने जात असत.

फिटलं म्हणा..

बीड जिल्ह्यातील शेतकरी कर्जाच्या चक्रव्युहात अडकला होता. हे लक्षात आल्यानंतर क्रांतिसिंहांनी त्यांना दिलासा दे ण्यस सुरवात केली. रूमणे हातात घ्या आणि फिटलं म्हणा, अशी त्यांनी घोषणा केली. त्यामुळे सावकाराला कर्जाचे जादा पैसे  द्यावयाचे नाही, असे आवाहन त्यांनी केले. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जमुक्त झाले.

तोफा आणा... रणगाडे आणा..मला मारून टाका...!!“
श्रीकृष्ण उबाळे यांनी फेसबुकवर नानांची आठवण शेअर केली आहे.  केज तालुक्यातील होळ येथे नानांची सभा होती. गावाच्या वेशीवर काही लोक आधीच जमलेले. त्यांच्या हातात दगड, अंडी आणि राग होता.
“हे काय? नानांवर दगडफेक? अंडीफेक?”
कोणी म्हणाले, “कम्युनिस्टांचं काय काम आमच्या गावात?”
कोणी ओरडले, “हे काँग्रेसचं गाव आहे...!”
हल्ला झाला. गर्दीतून दगड हवेत उडाले, काही अंडी नानांच्या अंगावर येऊन फुटली. पण नाना पाटील एक इंचही मागे हटले नाहीत. नानांनी हात वर करून सगळ्यांना थांबवलं. आवाजात भय नव्हतं... राग नव्हता... पण त्यात एक धग होती  अनुभवांची, लढ्याची आणि माणुसकीची.

“लोकहो... मी नाना पाटील हाय....! इंग्रज बंदुका घेऊन, लाखाचे बक्षीस जाहीर करून मला पकडायला निघाले होते. मी त्यांच्या गोळ्यांनी मेलो नाही...मला मारायचं असेल तर तोफा आणा...रणगाडे आणा रे....कारण ज्यांच्या साम्राज्यात सूर्य मावळत नव्हता, त्यांनाही मी झुकलो नाही. आणि आज, स्वतंत्र भारतात, दगडं आणि अंडी मारून मला घाबरवणार? मर्दपण असं नसतं....! मी निःशस्त्र आलोय... मारा मला....!
पण लक्षात ठेवा- आता निजामशाही नाही, इंग्रजशाही नाही...ही तुमची लोकशाही आहे.
तुम्ही मत टाकू नका... पण असले पोरचाळे करू नका...!“
 गावकऱ्यांना नानांच्या शब्दांनी भेदलं. राग शांत झाला. गर्व आणि अहंकार गळून पडला. एका म्हाताऱ्या शेतकऱ्याने पुढे येत वाकून नानांच्या पायांवर डोकं टेकवलं.
 “माफ करा नाना... आम्ही अंधारात होतो. तुमचं खरं रूप आज पाहिलं.”

त्या दिवशी दगड मारणारे हात, दुसऱ्या दिवशी नानांच्या प्रचारासाठी फड उभारू लागले.
अंडी फेकणारे तेच तरुण, नानांची भाषणं गावागावात ऐकवू लागले. नाना पाटील यांनी त्या प्रसंगातून एक मोठा धडा दिला -लोकशाही म्हणजे मतभेद स्वीकारणं, हिंसा नव्हे. विरोध मतांमध्ये असावा, माणुसकीत नव्हे. त्यांचं एक वाक्य त्या दिवशी गावाच्या भिंतीवर जसं कोरलं गेलं-
 “मी दगडांनी मरणार नाही... मी सत्यासाठी जन्मलोय..!“
आजही होळ गावात नानांची आठवण आली की लोक सांगतात-
“त्या दिवशी नाना आमच्यावर नव्हे, आमच्या अज्ञानावर जिंकले...!”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news