

The cold will intensify further, the minimum temperature will decrease
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : हवामानात चांगलाच बदल होत असून, सध्या १४ ते १६ अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवले जाणारे किमान तापमानात १० ते १६ डिसेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने ३ ते ४ अंशांनी घट होणार आहे. तापमान ११ ते १४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरणार असून, मध्यरात्रीनंतर आणि पहाटेच्या गारठ्यात वाढ होणार आहे. सकाळची धुक्याची चादर अधिक दाट राहाणार असून, कमाल तापमान २८ ते ३० अंश सेल्सिअसदरम्यान राहणार आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून बदल होत असून, किमान तापमान सध्या १४ ते १६ अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवले जात आहे. मात्र पुढील आठवड्यात तापमान आणखी २ ते ३ अंशांनी खाली जाण्याची शक्यता असून, ते ११ ते १४ अंश सेल्सिअसपर्यंत राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दिवसभर कोरडी हवा आणि रात्रीच्या वेळी थंडीत भर पडणार आहे. आठवड्याभरात किमान तापमानात टप्प्याटप्प्याने घट होत गारव्याची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, हवामानातील या बदलत्या चित्रामुळे रबी हंगामातील पिकांसाठी तापमानाचा परिणाम लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आवश्यक उपाययोजना ठेवण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
गारवा वाढणार
शहर परिसरात १० ते १६ डिसेंबर असे पाच दिवस पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहाणार असून, कमाल आणि किमान तापमान सरासरी-पेक्षा थोडेसे कमी राहण्याची शक्यता असल्याने रात्रीची थंडी वाढणार आहे. तर पहाटेच्या सुमारास गार वारे वाहण्याचा अंदाज आहे.
काळजी घेण्याचे आवाहन
थंडीचा जोर वाढत असल्याने सकाळ-संध्याकाळ उबदार कपड्यांचा वापर करण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दिवसा ऊन आणि रात्री गारवा यामुळे आरोग्य बिघडू नये म्हणून लहान मुले व वृद्धांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.