

Demand for immediate opening of government cotton procurement center
खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा :
कापसाला योग्य हमीभाव मिळावा तसेच शासकीय खरेदी सुलभ व्हावी यासाठी खुलताबाद तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन तहसील कार्यालयात देण्यात आले असून, नायब तहसीलदार प्रमोद सावंत यांनी ते स्वीकारले.
कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे. काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अॅड. अनिल नलावडे म्हणाले की, कापूस उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत असून, बाजारात दर कोसळत आहेत. शासनाने तातडीने शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन उभारेल.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस पक्ष लढा कायम ठेवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. निवेदनावर शहर अध्यक्ष मजीद माणियार, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष मसिद्दीनशेठ, बाबूराव भोसले, रमेश भोसले, शिवाजी झाल्टे, भाऊसाहेब पवार, दिलीप नागे, विजय भालेराव आदींची यावेळी उपस्थिती होती.