Sambhajinagar Senior Citizen Fraud : वृद्ध महिला भामट्यांच्या निशाण्यावर ; एकाच दिवशी दोघींना लुबाडले

पुंडलिकनगरात दोन तोळ्यांची पोत लंपास; जवाहरनगरात २० हजारांची रोकड चोरी
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : शहरामध्ये एकट्या फिरणाऱ्या अथवा बँकेत जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना हेरून त्यांना गंडा घालणाऱ्या सराईत भामट्यांच्या टोळ्या पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत. गुरुवारी (दि. २९) भरदिवसा अवघ्या काही तासांच्या अंतराने दोन वेगवेगळ्या भागांत दोन वृद्ध महिलांची दिशाभूल करून लाखो रुपयांचा ऐवज लुटण्यात आला. पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तथागत चौकात तोतया पोलिसांनी भाजीपाला घेऊन जाणाऱ्या ६८ वर्षीय आजींना गाठून त्यांची दोन तोळ्यांची सोन्याची पोत पळवली. तर दुसरीकडे जवाहरनगर ठाण्याच्या हद्दीतील शहानूरवाडी एसबीआय बँकेत पैसे मोजून देण्याचा बहाणा करत ७७ वर्षीय सेवानिवृत्त महिला अधिकाऱ्याचे २० हजार ५०० रुपये भामट्याने लंपास केले. या दोन्ही घटनांमुळे शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

घटना क्र. १ : तथागत चौकात तोतया पोलिसांनी लुबाडले

पुंडलिकनगर परिसरातील सुतगिरणी चौकात आदल्याच दिवशी एका महिलेची पोत हिसकावल्याची घटना ताजी असतानाच, गुरुवारी सकाळी ११ ते ११:३० वाजेच्या सुमारास तथागत चौक परिसरातील विवेकानंद नगरच्या भिंतीजवळ तोतया पोलिसांनी आणखी एका वृद्ध महिलेला लक्ष केले. स्पंदन नगर, बसंत अपार्टमेंट येथे राहणाऱ्या रत्नमाला शिवदास वाघ (६८) या फोनबॉक्स समोरील आठवडी बाजारातून भाजीपाला खरेदी करून पायी घरी परतत होत्या. त्या विवेकानंद नगरच्या भिंतीजवळ आल्या असता, रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका भामट्याने त्यांना काकू इकडे या, असा आवाज दिला.

Crime News
Sambhajinagar Water Shortage : सिल्लोडच्या जलसाठ्यांवर अवैध उपशाचे संकट

जवळ जाताच त्याने रुबाब दाखवत, शहरात खूप चोऱ्या वाढल्या आहेत, तुम्ही गळ्यात सोन्याचे दागिने घालून का फिरता? मी पोलिस आहे, तुमचे दागिने काढून पर्समध्ये ठेवा, असा दम भरला. रत्नमाला यांना संशय येऊ नये म्हणून, त्या भामट्याने पाठीमागून येणाऱ्या एका तरुणाला दरडावून थांबवले आणि तू पण गळ्यातील चैन काढून दे, असे सांगितले. तो तरुण प्रत्यक्षात भामट्याचाच साथीदार होता. त्याने तात्काळ गळ्यातील चैन काढून तोतया पोलिसाकडे दिली.

समोरचा इसम दागिना देत असल्याचे पाहून रत्नमाला यांचा पूर्ण विश्वास बसला. त्यांनीही घाबरून गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची पोत काढून पर्समध्ये ठेवत असतानाच तोतयाने हातचलाखी केली. दागिना उघडा ठेवू नका, आणा मी कागदाच्या पुडीत नीट बांधून देतो, असे म्हणत त्याने पोत घेतली आणि ती पर्समध्ये न ठेवता स्वतःच्या खिशात टाकली. काही सेकंदांतच बाजूला दुचाकी चालू ठेवून थांबलेल्या साथीदारासह धूम ठोकली. पोलिस निरीक्षक राजेंद्र मुंढे यांनी घटनास्थळी भेट दिली असून, हवालदार प्रकाश डोंगरे सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आहेत.

घटना क्र. २ : एसबीआय बँकेत मदत' करण्याच्या बहाण्याने रोकड लंपास

दुसरी घटना दुपारी २:४५ वाजेच्या सुमारास शहानूरवाडीतील सहकारनगर चौकातील एसबीआय बँकेच्या टिळकनगर शाखेत घडली. फिर्यादी वासंती सुरेश परदेशी (७७) या केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागातून २०१० मध्ये वर्ग-१ अधिकारी म्हणून निवृत्त झाल्या आहेत. त्या दरमहा मिळणाऱ्या पेन्शनवर उदरनिर्वाह करतात. गुरुवारी दुपारी सव्वादोन वाजता त्या दैनंदिन खर्चासाठी पैसे काढण्यासाठी एकट्याच एसबीआय बँकेत गेल्या होत्या. त्यांनी चेकद्वारे खात्यातून ४९ हजार ५०० रुपयांची रोकड काढली.

Crime News
Sindhudurg Crime : दिगवळे बंधाऱ्याजवळील १५३ लोखंडी प्लेटस्‌ चोरीस

कॅश काउंटरवरून रक्कम घेतल्यानंतर त्या काउंटरवरच थांबून नोटा मोजत होत्या. त्यावेळी ४० ते ४५ वर्षे वयाचा एक अनोळखी इसम त्यांच्या जवळ आला. तुम्हाला पैसे मोजता येत नसतील तर मी मोजून देतो, असे म्हणत त्याने संपूर्ण रक्कम हातात घेतली. नोटा मोजत असतानाच त्याने काही रक्कम वासंती यांच्या हातात परत दिली आणि त्यातील २० हजार ५०० रुपये काढून घेत पळ काढला. वासंती यांनी आरडाओरड करण्यापूर्वीच तो नजरेआड झाला होता. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.