

प्रा. मन्सूर कादरी
सिल्लोड : सिल्लोड-सोयगाव तालुक्यात यंदा अत्यल्प पर्जन्यमानामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, उपलब्ध जलसाठा जतन करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे आहे. नागरिक, पशुधन आणि वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी पाण्याचे काटेकोर नियोजन आवश्यक असताना, दुसरीकडे धरणे आणि जलसाठ्यांमधून अवैधरीत्या पाणी उपसा होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. विशेषतः उंडणगाव लघुप्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा होत असल्याची शेतकरी आणि ग्रामस्थांची ओरड आहे. मात्र, या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात किती प्रभावी कारवाई होत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तालुक्यातील जलसाठ्यांची उपलब्ध आकडेवारी ५ ऑक्टोबर २०२६ रोजीची असून, त्यानंतरच्या पाणीसाठ्यातील बदलांची अद्ययावत माहिती समोर येणे आवश्यक आहे. दुष्काळाची तीव्रता वाढत असताना जुन्या आकडेवारीच्या आधारे परिस्थितीचे आकलन केल्यास भविष्यातील पाणीटंचाईचे नियोजन करताना अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रशासनाने प्रत्येक प्रकल्पातील पाणीसाठ्याची प्रत्यक्ष पाहणी करून अद्ययावत स्थिती जाहीर करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
जलसाठ्यांची स्थिती चिंतानजक
छत्रपती संभाजीनगर पाटबंधारे उपविभाग क्रमांक ५ अंतर्गत येणाऱ्या प्रमुख जलसाठ्यांची ५ ऑक्टोबर २०२६ रोजीची स्थिती चिंताजनक आहे. उपलब्ध नोंदीनुसार, खेळणा मध्यम प्रकल्पात ८.७६० दलघमी म्हणजे ७९.१३ टक्के, अजिंठा-अंधारी मध्यम प्रकल्पात ०.१४० दलघमी म्हणजे १.८३ टक्के, केळगाव लघुप्रकल्पात १.९०० दलघमी म्हणजे १०० टक्के, उंडणगाव लघुप्रकल्पात ०.०१० दलघमी म्हणजे १.७५ टक्के, रहिमाबाद लघुप्रकल्पात ०.०१० दलघमी म्हणजे १.४९ टक्के, चारनेर लघुप्रकल्पात ३.४५० दलघमी म्हणजे ९९.९१ टक्के, निल्लोड लघुप्रकल्पात ०.८१० दलघमी म्हणजे १५.६९ टक्के, तर हळदा-जळकी प्रकल्पात ०.०३० दलघमी म्हणजे २.४४ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.
पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची भीती
या आकडेवारीनुसार, अजिंठा-अंधारी, उंडणगाव, रहिमाबाद आणि हळदा-जळकी या प्रकल्पांतील पाणीसाठा अत्यल्प आहे. त्यामुळे या जलसाठ्यांवर अवलंबून असलेल्या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. खेळणा, केळगाव, निल्लोड आणि चारनेर-पेंडगाव या प्रकल्पांतील पाणीसाठ्याचेही काटेकोर नियोजन आवश्यक आहे.
वीज जोडण्या खंडित केल्यानंतरही उपसा सुरूच
तालुक्यातील मध्यम व लघुप्रकल्प, पाझर तलाव, साठवण तलाव तसेच नदी-नाल्यांच्या परिसरातून संधी मिळेल त्या वेळी पाणी उपसा केला जात असल्याच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी हजार ते बाराशे फूट लांबीच्या केबल टाकून विद्युत मोटारी चालविल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. वीजजोडण्या खंडित केल्यानंतर डिझेल पंप किंवा सौरऊर्जेवर चालणाऱ्या पंपांचा वापर करून रात्रीच्या वेळी पाणी उपसा होत असल्याचाही आरोप आहे. उंडणगावपुरतीच ही समस्या मर्यादित नसून चारनेर-पेंडगाव, अजिंठा-अंधारी, केळगाव, निल्लोड, रहिमाबाद आणि खेळणा यांसह अन्य जलसाठ्यांच्या परिसरातही अशा प्रकारांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. प्रकल्पांच्या बुडीत क्षेत्रात तसेच नदी-नाल्यांच्या काठावर खासगी विहिरी खोदण्यात आल्याने अवैध उपशावर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान वाढले आहे.
भरारी पथके नियुक्त
प्रशासनाने भरारी पथके नियुक्त केली असतानाही पाणी उपशाच्या तक्रारी कायम असल्याने या पथकांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित होत आहेत. दुष्काळाच्या काळात पिण्याच्या पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना, जलसाठ्यांचे संरक्षण केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात दिसणे आवश्यक आहे.