

Another opportunity for Pradhan Mantri Awas Yojana houses in Padegaon
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा पडेगाव येथील प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळूनही आर्थिक अडचणीमुळे निर्धारित रक्कम भरता न आल्याने संधी गमावलेल्या पात्र नागरिकांसाठी महापालिकेने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. घरासाठी आवश्यक १० टक्के रकमेपैकी निम्मी रक्कम पहिल्या दहा दिवसांत भरल्यास अर्ज स्वीकारला जाणार असून, उर्वरित रक्कम भरण्यास पुढील २० दिवसांची मुदत मिळणार आहे. या प्रकल्पाच्या पाहणीनंतर बुधवारी (दि. ९) आयुक्त अमोल येडगे यांनी याबाबतचे निर्देश दिले.
महापालिकेमार्फत शहरातील विविध ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गृहप्रकल्पांची कामे सुरू आहेत. यात पडेगावच्या प्रकल्पात ३४०८ घरे आहेत. त्यापैकी २०४० घरांसाठी लाभार्थ्यांनी १० टक्के रक्कम भरली आहे. त्यामुळे उर्वरित १३६८ घरांसाठी पात्र लाभार्थी निश्चित करण्याची प्रक्रिया करावी लागणार आहे. दुसरीकडे महापालिकेकडे उर्वरित विजेत्यांची संख्या २४२१ आहे. उपलब्ध घरांच्या तुलनेत इच्छुकांची संख्या अधिक असल्याने पात्र नागरिकांना तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी १० टक्के रक्काम साधारण २० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत आहे. एवढी रक्कम अवघ्या दहा दिवसांत उभारणे अनेकांना शक्य होत नसल्याचे महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पहिल्या टप्प्यात निम्मी रक्कम भरण्याची सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर उर्वरित ५० टक्के रक्कम पुढील २० दिवसांत भरता येईल. अशा प्रकारे पात्र लाभार्थ्यांना संपूर्ण १० टक्के रक्कम भरण्यासाठी ३० दिवसांची मुदत मिळणार आहे. यापूर्वी अर्ज करून पात्र ठरलेले, विजेते घोषित झाले तरी पैसे भरता न आल्याने घरापासून वंचित राहिलेले लाभार्थी, प्रतीक्षा यादीतील अर्जदार तसेच नॉन-विनर नागरिकांनाही या संधीचा लाभ घेता येणार आहे.
इच्छुकांनी पुढील दहा दिवसांत १० टक्के रकमेपैकी ५० टक्के रक्कम भरण्याची तयारी दर्शवून प्रधानमंत्री आवास योजना विभागाशी संपर्क साधून अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. योजनेची अंमलबजावणी ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी करण्यासाठी लाभार्थी निश्चित करणे आवश्यक आहे. उपलब्ध घरांची संख्या मर्यादित असल्याने पात्र इच्छुकांना प्राधान्यक्रमानुसार घरांचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे संधी असूनही विलंब केल्यास घराची संधी हातची जाण्याची शक्यता आहे.
३० दिवसांत १० टक्के रक्कम
पहिल्या दहा दिवसांत निर्धारित १० टक्के रकमेपैकी ५० टक्के रक्कम भरावी लागेल. उर्वरित रक्कम पुढील २० दिवसांत भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. आर्थिक अडचणीतील पात्र नागरिकांना यामुळे एक महिन्याचा अवधी मिळणार आहे.
१३६८ घरे, २४२१ इच्छुक
महापालिकेकडे उर्वरित विजेत्यांची संख्या २४२१ आहे. मात्र प्राधान्यक्रमातील उपलब्ध घरे केवळ १३६८ आहेत. त्यामुळे पात्र नागरिकांनी विलंब न करता विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नॉन-विनरलाही द्वार खुले
पूर्वी पात्र ठरूनही रक्कम न भरल्याने घरापासून वंचित राहिलेले विजेते, प्रतीक्षा यादीतील अर्जदार आणि नॉन-विनर यांनाही नव्या संधीचा लाभ घेता येणार आहे-