

The portion of the house obstructing the road was demolished using a JCB
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेल्या जागेवर उभारलेले बांधकाम अखेर महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने हटविले. पडेगाव येथील सावित्रीबाई फुले नगरात गुरुवारी (दि. १०) जेसीबीच्या सहाय्याने घराचा रस्त्याच्या हद्दीत येणारा भाग पाडण्यात आला. या कारवाईमुळे रस्त्याच्या कामातील प्रमुख अडथळा दूर झाला असून, रखडलेले काम पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध झाली आहे.
पडेगाव भागातील सावित्रीबाई फुले नगर परिसरात महापालिकेकडून रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, रस्त्याच्या जागेत अतिक्रमण करून घराचे बांधकाम करण्यात आल्याने काम पुढे नेण्यात अडचण निर्माण झाली होती.
संबंधित बांधकाम हटविल्याशिवाय रस्त्याचे काम पूर्ण करणे शक्य नसल्याने अतिक्रमण हटाव विभागाने कारवाईचा निर्णय घेतला. महापालिका पथकाने गुरुवारी जेसीबीच्या माध्यमातून घराचा रस्त्याला बाधित ठरणारा भाग पाडला. त्यानंतर रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेली जागा मोकळी झाली. त्यामुळे अडथळ्यामुळे रखडलेले काम आता पुढे नेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ही कारवाई अतिक्रमण हटाव विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या आदेशानुसार करण्यात आली. उपायुक्त सविता सोनवणे आणि सहायक आयुक्त संजय सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली इमारत निरीक्षक मुकेश खडसे, रवींद्र देसाई आणि अशोक कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.