Bharat Ratna Chaudhary Charan Singh : माजी पंतप्रधान चरणसिंहांनी मराठवाड्याला प्रथमच दिली मंत्रिपदाची संधी

माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव,  चौधरी चरणसिंह
माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव, चौधरी चरणसिंह


छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान माजी पंतप्रधान चरणसिंह, पी. व्ही. नरसिंहराव यांना जाहीर केला आहे. या दोन्ही नेत्यांचे मराठवाड्याशी असलेले नाते स्मरणात राहणारे आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात मराठवाड्याला चौधरी चरणसिंह यांनीच प्रथमच संधी दिली. धाराशिवचे खा. टी. एस.शृंगारे हे त्यांच्या कार्यकाळात केंद्रात राज्यमंत्री झाले. तर स्वामी रामानंद तीर्थ, गोविंद भाईश्रॉफ, शंकरराव चव्हाण यांच्यामुळे पंतप्रधान नरसिंहरावांचे मराठवाड्याशी जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. Bharat Ratna Chaudhary Charan Singh

निझामशाहीच्या जोखडातून मराठवाडा मुक्‍त झाल्यानंतर या भागाने नेहमीच काँग्रेसला कौल दिला. परंतु पं. नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात मराठवाड्यातील एकाही खासदाराला केंद्रात मंत्रिपदावर संधी मिळाली नाही. ही संधी चौधरींच्या काळात मराठवाड्याला शृंगारे यांच्या रूपाने प्रथमच मिळाली. शृंगारे यांच्याकडे दळणवळण खात्याचे राज्यमंत्रीपद देण्यात आले होते. टपाल कार्यालयासाठी इमारती, सक्ष्म लहरींच्या मनोर्‍यांची उभारणी ही त्यांनी अत्यल्प कारकिर्दीत केलेली कामे. अतिशय साधा आणि प्रामाणिक कार्यकर्ता अशी ओळख असणारे शृंगारे नंतर मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्षही झाले होते. Bharat Ratna Chaudhary Charan Singh

याबाबत बोलताना धाराशिवचे ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाठक नारीकर म्हणाले, की 1977 च्या निवडणुकीत काँग्रेसविरोधी लाट असतानाही शृंगारे हे धाराशिव मतदारसंघातून निवडून गेले होते. यशवंतराव चव्हाण यांच्या ते जवळचे. चरणसिंह हे पंतप्रधान तर यशवंतराव हे उपपंतप्रधान झाल्याने शृंगारे यांना मंत्रीपद मिळाले होते. खासदार होईपर्यंत शृंगारे यांनी दिल्‍ली कधीच पाहिली नव्हती. ते सुटकेसमधून काही कागदपत्रे आणि कपडे सोबत घेऊन दिल्‍लीत गेले, तीच सुटकेस घेवून सरकार कोसळल्यानंतर दिल्‍लीहून परतले होते, अशी आठवण सांगितली जाते.

भारतरत्न या पुरस्काराने नरसिंहराव यांचा झालेला सन्मान हा मराठवाड्यासाठी सुखावह ठरला आहे. कारण हैदराबाद मुक्‍तिसंग्रामात राव यांचा सहभाग राहिला आहे. या लढ्याचे नेते स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते आणि शंकरराव चव्हाण हे सचिव म्हणून काम पाहत असत. नरसिंहराव आणि शंकराव चव्हाणांची मैत्री नेहमीच चर्चेची राहिली. नरसिंहराव यांनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळात गृहमंत्रीपद दिले होते. राव हे पंतप्रधान असताना किल्‍लारी परिसर भूकंपाने हादरला होता. तेव्हा भूकंपग्रस्त भागातील लोकांचे अश्रू पुसण्यासाठी ते या भागातही आले होते. या संकटावर मात करण्यासाठी केंद्राकडून भरीव सहकार्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले होते.

नरसिंहराव हे मनुष्यबळ विकास मंत्री आणि पंतप्रधान असताना छत्रपती संभाजीनगरात येऊन गेले होते. स. भू. महा विद्यालयाच्या मैदानावर गोविंदभाईंचा त्यांनी सत्कारही केला होता. तसेच त्यांच्या काळतच भाईंना पद्मविभूषण गोंविंदभाई श्रॉफ जाहीर झाला होता. गोविंदभाईंच्या आंदोलनामुळेच नरसिंहराव यांनी शंकरराव चव्हाण यांचा विरोध पत्करून 371 (2) मराठवाडा, विदर्भ, उर्वरित महाराष्ट्रासाठी वैधानिक विकास मंडळाचे स्थापना केली होती. या मंडळाला वेळोवेळी कायद्यानुसार वेळोवेळी मुदतवाढ मिळाली. तर, मागील चार वर्षांपासून मुदतवाढीच्या प्रस्तावाला केंद्राने मंजुरी न दिल्यामुळे ही मंडळे सध्या अस्तित्वहीन झाल्यासारखीच आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news