Maratha reservation protest: चार दिवसांत राज्यात एसटीच्या १०० बसेसची तोडफोड; महामंडळाला मोठा आर्थिक फटका | पुढारी

Maratha reservation protest: चार दिवसांत राज्यात एसटीच्या १०० बसेसची तोडफोड; महामंडळाला मोठा आर्थिक फटका

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: राज्यात विविध ठिकाणी मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. गेल्या चार दिवसात राज्यात एसटीच्या १०० पेक्षा जास्त बसेसची तोडफोड झाली आहे. तर ५० पेक्षा जास्त आगारातील प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. बुधवारी स्थानिक पोलीस प्रशासनाने दिलेल्या सुचनेनुसार खबरदारीचा उपाय म्हणून मराठवाड्यातील परभणी, धाराशीव, लातूर, जालना, नांदेड, बीड, छ. संभाजीनगर व पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या जिल्ह्यातील सर्व एसटी वाहतूक बंद करण्यात आली होती. इतर जिल्ह्यातील मराठवाड्याकडे जाणारी एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. या जिल्ह्यातील ५० पेक्षा जास्त आगाराची वाहतूक पूर्णतः बंद आहे. (Maratha reservation protest)

गेल्या ४ दिवसात १०० पेक्षा जास्त एसटी बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. तर ४ एसटी बसेसची जाळपोळ केली आहे. एसटी त्यामुळे सुमारे पाच कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील वाहतूक बंद असल्याने दररोज एसटीचा तीन ते साडेतीन कोटी रुपयांचा महसूल बुडत आहे. (Maratha reservation protest)

Maratha reservation protest: एसटीच टार्गेट का ?

एसटीच्या गाड्या बंद केल्याने सर्व वाहतूक ठप्प होते व सर्व व्यवहार बंद होतात. वाहतुकीचे साधन नसल्याने कामावर जाणारे व शाळेचे विद्यार्थी जाऊ शकत नाहीत. ग्रामीण भागात एसटी हेच प्रवासाचे मुख्य साधन असल्याने कुठलाही बंद आपोआप यशस्वी होतो. म्हणून एसटीला टार्गेट केले जाते एसटीवर दगडफेक केली तर फार मोठी कारवाई होत नाही. कारण सार्वजनिक वाहतूक आहे. शिवाय चांगली प्रसिद्धी मिळते.

Back to top button