

1,368 Ramai Awas beneficiaries awaiting homes
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रमाई आवास योजनेंतर्गत प्रमाणपत्रे मिळालेल्या १,८९३ लाभार्थ्यांपैकी केवळ ५२५ जणांनी घरांचे बांधकाम सुरू केले आहे. उर्वरित १,३६८ लाभार्थ्यांच्या घरबांधणीला अद्याप सुरुवात झालेली नाही. बांधकामाच्या प्रगतीनुसार निधी वितरित केला जात असल्याने पहिला हप्ता मिळाल्याशिवाय घराचे काम सुरू करणे शक्य नसल्याची भूमिका लाभार्थी मांडत आहेत.
दुसरीकडे, पहिला हप्ता २५ हजारांऐवजी ५० हजार रुपये करण्याचे आदेश पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिले होते. दर महिन्याला किमान दोन हजार लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या होत्या. मात्र, योजनेच्या अंमलबजावणीला अद्याप अपेक्षित गती मिळालेली नाही.
रमाई आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरित करण्यासाठी ३० जुलै रोजी संत एकनाथ रंगमंदिरात कार्यक्रम घेण्यात आला होता. पालकमंत्री संजय शिरसाट, इतर बहुजन मागास विभागाचे मंत्री अतुल सावे, महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना करण्यात आले.
शहरातील १,८९३ प्रमाणपत्रांचे वाटप या कार्यक्रमात योजनेच्या संथ अंमलबजावणीवर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली होती. याच गतीने काम सुरू राहिले, तर नागरिकांची घरे कधी पूर्ण होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. लाभार्थ्यांना सुरुवातीला दिला जाणारा २५ हजार रुपयांचा पहिला हप्ता वाढवून ५० हजार रुपये देण्याचे आदेशही त्यांनी दिले होते.
प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करावी आणि दर महिन्याला किमान दोन हजार लाभार्थ्यांची नावे जाहीर करावीत, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला केल्या होत्या. मात्र, या सूचनांनंतरही योजनेच्या कामाला अपेक्षित गती मिळालेली नाही.
स्थळपाहणी, जिओ-टॅगिंगनंतर निधी
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून बांधकाम सुरू केलेल्या लाभार्थ्यांच्या घरांची स्थळपाहणी केली जात आहे. बांधकामाची स्थिती तपासून जिओ-टॅगिंगची छायाचित्रे घेतली जात आहेत. त्यानंतर बांधकामाच्या प्रगतीनुसार निधी वितरित केला जात असल्याचे अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांकडून स्थळपाहणी
रमाई आवास योजनेतील १,८९३ लाभार्थ्यांपैकी ५२५ जणांनी घरांचे बांधकाम सुरू केले आहे. आमच्या कर्मचाऱ्यांकडून स्थळपाहणी केली जात असून, जिओ-टॅगिंगची छायाचित्रे घेतली जात आहेत. बांधकाम सुरू केलेल्या लाभार्थ्यांना योजनेचे पैसे दिले जात आहेत. लाभार्थ्यांनी घरांचे बांधकाम सुरू करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांनी केले.