

परळी, पुढारी वृत्तसेवा दुष्काळी परिस्थिती आणि सततच्या नापिकीमुळे दादाहारी वडगाव येथील माजी सरपंच तथा शिवसेना शिंदे गटाचे माजी परळी तालुकाप्रमुख शिवाजीराव शिंदे (६०) यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि. २५) रात्री घडली.
शिंदे हे दादाहारी वडगाव येथील राहत्या घरी असताना त्यांनी खोलीतील पंख्याला लुंगीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. परळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. शनिवारी उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली.
शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास दादाहारी वडगाव येथील सार्वजनिक स्मशानभूमीत शिवाजीराव शिंदे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवाजीराव शिंदे यांच्या पश्चात एक भाऊ, आठ बहिणी, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने दादाहारी वडगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शिवाजीराव शिंदे यांची दगडवाडी शिवारात शेती आहे. यंदा पावसाअभावी शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे सततची नापिकी आणि कुटुंबाची शेतीवर अवलंबून असलेली आर्थिक घडी याच्या सततच्या चिंतेने ते तणावग्रस्त होते. यामुळे ते सतत तणावात असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. शेत पिकले नाही, आपण काय खायचे?' अशी चिंता ते व्यक्त करीत असत अशी माहिती त्यांच्या मुलाने पोलिसांना दिलेल्या नोंद अर्जात नमूद केली आहे.