

कडा : आष्टी तालुक्यातील पिंपरी घाटा शिवारात आढळलेल्या अनोळखी तरुणाच्या खुनाचा अंभोरा पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावत दोन आरोपींना जेरबंद केले. तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत ही कारवाई करून आरोपी संदीप लल्लू सोनखर (वय २१) आणि भागवत जालिंदर आरे (वय २८, दोघेही रा. शिक्रापूर, जि. पुणे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घाटात आढळला तरुणाचा मृतदेह..
२५ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास पिंपरी घाटा शिवारात बीड-अहिल्यानगर महामार्गालगत घाटामध्ये अंदाजे २५ ते ३० वर्षे वयाच्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. प्रथमदर्शनी हा प्रकार घातपाताचा असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली.
मृताची ओळख पटली; खुनाचा गुन्हा दाखल..
पोलिसांनी मृताची ओळख पटवली. त्यानंतर मृताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून २६ सप्टेंबर रोजी खून आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी संदीप लल्लू सोनखर (वय २१) आणि भागवत जालिंदर आरे (वय २८) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी कोण आणि खुनामागील नेमके कारण काय? याबाबत सुरुवातीला पोलिसांकडे ठोस माहिती नव्हती.
सुतावरून गाठला स्वर्ग...
गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. मोबाईल लोकेशन, तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून संशयितांचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान मिळालेल्या धाग्यांचा मागोवा घेत पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या चार ते सहा तासांत आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.कोणताही ठोस धागा नसताना तपासाला दिशा देत आरोपींपर्यंत पोहोचल्याने अंभोरा पोलिसांची ही कारवाई ‘सुतावरून स्वर्ग गाठला’ अशी ठरली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे यांच्या नेतृत्वाखाली अंभोरा पोलिसांच्या पथकाने तपासाची सूत्रे हाताळली. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे करीत आहेत.
पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक...
पिंपरी घाटा परिसरात तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. गंभीर गुन्ह्याचा तपास वेगाने पुढे नेत काही तासांत दोन आरोपींना ताब्यात घेतल्याने नागरिकांमध्ये पोलिसांच्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त होत आहे. अंभोरा पोलिसांच्या या तपास कौशल्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.