

केज : उपजिल्हा रुग्णालयाची प्रशस्त मोठी इमारत बांधण्यात आली. बांधकाम पूर्ण झाल्यापासून काही कालावधीतच शौचालयांचे आउटलेट अर्धवट ब्लॉक झाल्याने रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांना प्रचंड गैरसोय होत आहे. रुग्णालयातील मुख्य इमारतीतील पुरुष आणि महिला शौचालयांमधून सांडपाणी परत येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दुर्गंधीमुळे परिसरात अस्वच्छता पसरली आहे.
रुग्णालयात औषध उपचार घेणाऱ्या रुग्णांना शौचालये वापरण्यास अयोग्य झाल्याने रुग्णांना पर्यायी व्यवस्था शोधावी लागत आहे. दुरुस्तीचे काम तात्काळ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. रुग्णालयात रोज शेकडो रुग्णांची वर्दळ असताना अशा प्रकारची स्वच्छता समस्या गंभीर ठरत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. अनेक नातेवाईकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी दुरुस्तीचे काम झालेले नाही.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने आउटलेट ब्लॉक झाल्याच्या संदर्भाने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देऊन कित्येक वेळा मागणी केली. त्यानंतर निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे कळविण्यात आले. सदरील कामाचे टेंडर मंजूर झाले असूनही काम अद्याप का सुरू केले नाही? हा प्रश्न आहे.
एकीकडे रुग्णालयात औषधांचा तुटवडा तर दुसरीकडे घाण
ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना उपचार घेतल्या शिवाय पर्याय नाही. रुग्णालयातील गंभीर प्रकारा बाबत लोकप्रतिनिधीनी लक्ष देऊन रुग्णांची गैरसोय थांबवावी अशी मागणी केली जात आहे. रुग्णालयात उपचार करण्यासाठी की आजारी पडण्यासाठी ? :- उपचारासाठी ॲडमीट करण्यात आलेल्या रुग्णांच्या मुलाने म्हटले आहे की, वॉर्ड शेजारी शौचालयातून घाण वासामुळे वडिलांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. आम्ही रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येतो की, आजारी पडण्यासाठी ? अशी जळजळीत प्रतिक्रिया रुग्णाच्या मुलाने दिली आहे.