

Dhule Balsane Area Electricity Supply
धुळे : साक्री तालुक्यातील बळसाणे परिसरात उभारण्यात येणाऱ्या नवीन वीज उपकेंद्रामुळे वीजपुरवठा अधिक सक्षम, दर्जेदार आणि सुरळीत होणार असून शेती, घरगुती वापर तसेच भविष्यातील औद्योगिक विकासालाही मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वतीने साक्री तालुक्यातील बळसाणे (सतमाने फाटा) येथे उभारण्यात येणाऱ्या ३३/११ के.व्ही. नवीन उपकेंद्राच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता सायस दराडे, कार्यकारी अभियंता भाऊसाहेब पाटील, अपर तहसीलदार अधिकार पेंढारकर, दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, बळसाणेचे सरपंच ज्ञानेश्वर हालोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री रावल म्हणाले की, वाढत्या वीज मागणीच्या पार्श्वभूमीवर नवीन उपकेंद्रामुळे परिसरातील वीजपुरवठा अधिक विश्वासार्ह होईल. सिंचन, शेती, उद्योग, व्यावसायिक उपक्रम आणि सर्वसामान्य नागरिकांना याचा थेट फायदा होणार आहे. तसेच विद्यमान वीज यंत्रणेवरील ताण कमी होऊन भविष्यातील वाढती गरज पूर्ण करण्यास मदत मिळेल.
शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पाणी, वीज आणि शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. विहिरी, बंधारे, सिंचन सुविधा आणि शेतापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
बळसाणे येथे उभारण्यात येणाऱ्या ३३ के.व्ही. उपकेंद्रासोबत मुख्य व जोडणी वीजवाहिन्यांची कामेही करण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे बळसाणे, कढरे, सतमाने, आगरपाडा, दुसाने, इंदवे, हट्टी, ऐचाळे, डोंगराळे तसेच अन्य तीन पाड्यांसह एकूण १२ गावांतील नागरिकांना लाभ मिळणार आहे. शेती, घरगुती वापर आणि आगामी औद्योगिक गरजा लक्षात घेता हे उपकेंद्र महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिंदखेडा मतदारसंघात ऊर्जा क्षेत्रात अनेक महत्त्वाचे प्रकल्प राबविले जात असल्याचे सांगताना रावल यांनी शिंदखेडा येथे १३२ के.व्ही. तर शिरपूर येथे २२० के.व्ही. क्षमतेचे उपकेंद्र उभारण्यात आल्याची माहिती दिली. दहिवद परिसरातही ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
धुळे जिल्हा सौरऊर्जेच्या क्षेत्रात देशात वेगाने प्रगती करत असून ‘सोलर हब’ म्हणून विकसित होत आहे. ‘कुसुम’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौरपंपांचा लाभ देण्यात येत असून भविष्यात २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी सौरऊर्जेचा अधिक प्रभावी वापर करण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सौरऊर्जा साठवणुकीसाठी बॅटरी तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याबाबतही शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ऊर्जा विभागामार्फत जिल्ह्यात विविध विकासकामांना गती मिळाली असून नवीन उपकेंद्रे आणि वीज प्रकल्प उभारले जात आहेत. सिंचन, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील विकासालाही प्राधान्य देण्यात येत असल्याचे रावल यांनी नमूद केले.
कार्यक्रमात दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले, तर अधीक्षक अभियंता सायस दराडे यांनी प्रास्ताविकातून प्रकल्पाची माहिती दिली.