

Dr Sampada Munde case update
माजलगाव : डॉ. संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून एक प्रकारे त्यांचा खून झाला आहे. या पाठीमागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याने या प्रकरणात न्याय मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे संशयित खून प्रकरणाचा खटला बीड जिल्ह्यातील न्यायालयांतर्गत चालवावा, अशी मागणी बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी केली आहे.
पोटभरे यांनी म्हटले आहे की, हा खटला बीडच्या जनतेशी विशेषतः महिला सुरक्षिततेशी आणि न्यायप्रणालीवरील विश्वासाशी थेट निगडित आहे. त्यामुळे न्यायालय बीड जिल्ह्यातच राहिल्यास साक्षीदारांना सहज उपस्थित राहता येईल आणि जनतेलाही पारदर्शकपणे न्यायनिवाडा पाहता येईल. त्यांनी पुढे सांगितले की, या प्रकरणाला अन्यत्र हलविण्याचा प्रयत्न केल्यास जनतेत रोष निर्माण होऊ शकतो. न्याय मिळावा, परंतु तो लोकांच्या डोळ्यासमोर मिळावा. त्यासाठी एसआयटी चौकशी होऊन जलद न्यायालयात हा खटला चालविण्यात यावा.
दरम्यान डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील नागरिक आक्रमक झाले आहेत. अशा प्रवृत्तीला कठोरातील कठोर शासन देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत.