

Beed News: Six individuals, including Superintending Engineer Rajput, suspended in corruption case
बीड, पुढारी वृत्तसेवा : महावितरणच्या विभागीय कार्यालयात देखभाल व दुरुस्ती कामाच्या निधी वाटपातील 13 कोटी 70 लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांविरूध्द निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रेमसिंग राजपूत, कार्यकारी अभियंता सुबोध डोंगरे, उपकार्यकारी अभियंता शाम मोरे, उपकार्यकारी अभियंता शाम कुंभार, सहायक अभियंता चंद्रकांत प्रधान आणि सहाय्यक अभियंता महेश गुंजाळ या सहाजणांना महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाने निलंबित केले आहे. घोटाळ्याची रक्कम वसूल करून गुन्हे दाखल व्हावेत यासाठी येणाऱ्या अधिवेशनात आवाज उठवणार असल्याची माहिती आ. विजयसिंह पंडित यांनी दिली आहे.
आ. विजयसिंह पंडित यांनी दि. 25 ऑगस्ट 2026 रोजी महावितरणच्या कार्यकारी संचालकांकडे सर्व पुराव्यांसह लेखी तक्रार केली होती. सदरील तक्रारीची दखल घेत मुख्य अभियंता (वितरण) यांनी दोन सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. संबंधित समितीने दिलेल्या चौकशी अहवालावरून ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान केवळ निलंबनाची कारवाई करून चालणार नाही, संबंधितांकडून अपहाराची रक्कम वसूल करून त्यांच्याविरूध्द तात्काळ गुन्हे दाखल व्हावेत यासाठी येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे आ. विजयसिंह पंडित यांनी सांगितले.
बीड येथील महावितरणच्या विभागीय कार्यालयात कार्यकारी अभियंता व इतरांनी संगनमताने सन 2025-26 च्या आर्थिक वर्षातील देखभाल व दुरूस्तीच्या कामासाठी सुमारे 13 कोटी 70 लाख रुपये निधी वाटपात आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार आ. विजयसिंह पंडित यांनी केली होती. महावितरणच्या ग्राहकांना दर्जेदार, सुरळीत व योग्य दाबाने वीज पुरवठा उपलब्ध व्हावा या हेतूने आवश्यक देखभाल व दुरुस्तीसाठी हा निधी खर्च होणे अपेक्षित होते.
मात्र कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता (कांदी), अति कार्यकारी अभियंता (प्रभारी) व इतरांनी मर्जीतील कंत्राटदारांशी आर्थिक संगनमत करून सुमारे 20 ते 25 टक्के लाच स्विकारून बेकायदेशिररीत्या निधी वितरीत केला असून या प्रकरणी स्वतंत्र चौकशी समिती नियुक्ती करून शंभर टक्के स्थळ पाहाणी व तांत्रीक तपासणी करण्याची आवश्यकता असल्याचे आ. विजयसिंह पंडित यांनी तक्रारीत म्हटले होते.
सदरील तक्रारीची दखल घेत महावितरणचे मुख्य अभियंता (वितरण) यांनी दि. 22 सप्टेंबर 2026 रोजी अधियक अभियंता नितीन काळे आणि कार्यकारी अभियंता सुनिल पावरा यांची दोन सदस्यी समिती चौकशीसाठी नेमली होती. संबंधित समितीने बीड जिल्ह्यात येऊन स्थळ पाहणी व तांत्रिक तपसणी करून आपला अहवाल वरिष्ठांकडे सादर केला होता.
त्या अनुषंगाने महातिरणच्या वरिष्ठ कार्यालयाने आज महावितरणचे बीड जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता प्रेमसिंग राजपुत, महावितरणचे कार्यकारी अभियंता सुबोध डोंगरे, गेवराईचे तत्कालीन उपकार्यकारी अभियंता शाम मोरे, उपकार्यकारी अभियंता शाम कुंभार, सहायक अभियंता चंद्रकांत प्रधान आणि सहायक अभियंता महेश गुंजाळ या सहा जणांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले.