

Gevrai former UpSarpanch Death
गजानन चौकटे
गेवराई: बीडमधील गेवराईच्या लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या मृत्यूने वेगळे वळण घेतले आहे. मृत गोविंद बाहेर जाताना कुठे साधी काठीही घेऊन जात नव्हता. मग,त्याच्या कारमध्ये पिस्तुल आलेच कुठून? असा सवाल नातेवाईकांनी केला आहे. त्यांचा घातपात झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यामुळे या घटनेने नवा ट्विस्ट घेतला आहे.
लुखामसला (ता.गेवराई जि.बीड) माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे हे बीडच्या पंचायत समितीत ऑपरेटर म्हणून काम करत असतानाच ते प्लाटिंगच्या व्यवसायात सक्रीय झाले. ऑपरेटर असताना गोविंद बर्गे हे साथीदाराबरोबर कला केंद्रात जाऊ लागले. त्यातच पारगाव (जि.धारशिव) कला केंद्रातील एका २१ वर्षीय नर्तकीसोबत गोविंदची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. नर्तिकेने लाखोंच्या महागड्या वस्तू गोविंद याच्याकडून घेतल्या. एवढ्यावर समाधान न झाल्याने गेवराईतील बंगला माझ्या नावावर करा. यावरून गोविंद बर्गे व नर्तिका यांच्यात वादाची ठिणगी पडली.
त्यामुळे नर्तिकेने आबोला धरल्याने मंगळवारी गोविंद बर्गे हे नैराश्यात होते. त्यातच त्यांच्या संशयास्पद मृत्यूने गेवराई तालुक्यात एकच खळबळ उडाली. बर्गे यांच्या नातेवाईकांनी आत्महत्येच्या पाठीमागे घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.
गोविंद बर्गे यांनी पारगाव कला केंद्रातील नर्तिकेच्या घरासमोर स्वतःची कार पार्क करून आत बसून कानशिलात गोळी झाडली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा कार लॉक (बंद) स्थितीत होती. आणि बॅटरी पूर्णपणे उतरलेली होती. आतमध्ये गोविंद बर्गे यांचा मृतदेह चालक सीटवर आढळून आला. प्राथमिक पोलीस निरीक्षणानुसार, गोळी उजव्या कानशिलातून शिरून डाव्या बाजूने बाहेर पडल्याचे आढळले.
नातेवाईकांच्या मते, गोविंद बर्गे साधारणपणे कुठेही जाताना कधीही साधी काठीही सोबत ठेवत नसत. त्यांच्या कडे कधीही पिस्तुल नव्हते, त्यामुळे त्यांना पिस्तुल कसे मिळाले यावर संशय व्यक्त केला जात आहे. या सर्व गोष्टी संशयास्पद असल्याने नातेवाईकांनी या घटनेत घातपात झाल्याचा दावा केला आहे.
संशयित नर्तिकेवर गुन्हा दाखल केला आहे. अटक करून न्यायालयात हजर केल्यावर तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. नातेवाईकांनी आरोप केला आहे की, नर्तिकेने गोविंद यांना आपल्या गावी बोलावून हत्या केली आहे.
गोविंद बर्गे यांची पारगाव कला केंद्रातील २१ वर्षीय नर्तकी यांच्याशी ओळख दीड वर्षांपूर्वी झाली होती. कालांतराने दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. पूजाने गोविंदकडून पावणेदोन लाखांचा मोबाईल फोन, सोन्याचे दागिने आणि जमीनही घेतले होती. परंतु, काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद सुरु झाला. तिने गेवराईतील बंगला आणि शेती आपल्या नावावर करण्याचा हट्ट धरला होता. मागणी न मानल्यास बलात्काराचा आरोप दाखल करण्याची धमकीही दिल्याचे नातेवाईकांकडून समजते. या प्रकाराने बर्गे प्रचंड मानसिक त्रासात आले.
सध्या पोलीस या घटनेच्या सखोल चौकशीत व्यस्त आहेत. शिवाय नर्तिकाची सखोल चौकशी करत तिच्या जबाबांवरून पुढील कारवाई निश्चित केली जाणार आहे. कार लॉक कशी झाली, पिस्तुल कुठून आले आणि प्रकरणामागील खरी कारणे याचा शोध पोलिस लवकरच लावतील, अशी अपेक्षा नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.