

माजलगाव, पुढारी वृत्तसेवा : माजलगाव तालुक्यातील लोनगाव येथील सबस्टेशनला गेलेली वीज वाहक तार अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा जाग्यावरच होरपळून मृत्यू झाला. ही घटना आज (दि.२५) सकाळी निपाणी टाकळी येथे घडली. बाळासाहेब वैजनाथ पांडे (वय ६५) असे शेतकऱ्याचे नाव आहे.
लोनगाव येथे महावितरण कंपनीचे सबस्टेशन आहे. या सबस्टेशन करिता वीज वाहक तार ही निपाणी टाकळी येथून गेलेली आहे. याच गावातील रहिवाशी बाळासाहेब पांडे हे त्यांच्या शेतातून पहाटे घराकडे येत होते. या दरम्यान गावच्या स्मशानभूमी जवळ आले असता सबस्टेशन गेलेली मुख्य वीज वाहक तार अंगावर पडली. त्यातच त्यांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेने निपाणी टाकळी सह पंचक्रोशी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
माजलगाव तालुक्यात अनेक ठिकाणी वीज वाहक तार, खांब हे धोकादायक स्थितीत आहेत. याच्या दुरुस्तीबाबत शेतकरी, ग्रामस्थ यांच्याकडून महावितरणकडे अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. पण महावितरण शेतकऱ्यांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षदा देते. निपाणी टाकळी येथील ही घटना जीर्ण व धोकादायक असलेल्या वीज वाहक तारेमुळेच घडली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
हेही वाचा :