Beed Stray Dog | आष्टीत भटक्या श्वानांच्या निर्बीजीकरणासाठी केंद्र सुरू

आमदार सुरेश धस यांच्या हस्ते उद्घाटन; रेबीज प्रतिबंध आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल
Ashti Stray Dog Sterilization Center
Ashti Stray Dog Sterilization CenterPudhari
Published on: 
Updated on: 

Ashti Stray Dog Sterilization Center

आष्टी : आष्टी शहरातील भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासह रेबीजसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका कमी करण्यासाठी नगरपंचायतीच्या वतीने श्वान निर्बीजीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. आमदार सुरेश धस यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. ‘युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटी’च्या माध्यमातून ‘कार्गो ॲनिमल रेबीज एलिमिनेशन’अंतर्गत ही मोहीम राबविण्यात येत आहे.

भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे, त्यांचे आरोग्य जपणे आणि श्वानदंशातून होणाऱ्या रेबीजचा धोका कमी करणे, हा मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. उद्घाटनप्रसंगी आमदार सुरेश धस यांनी केंद्राची पाहणी करून तेथील सुविधा, निर्बीजीकरणाची प्रक्रिया आणि रेबीज प्रतिबंधासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली.

Ashti Stray Dog Sterilization Center
Beed Diesel Theft | आष्टीत डिझेल चोरट्यांविरुद्ध मोठी कारवाई; बीएमडब्ल्यूसह चार वाहने जप्त

शस्त्रक्रियेनंतर चार दिवस विशेष देखभाल

या मोहिमेसाठी संस्थेच्या वतीने स्वतंत्र श्वान पथक नियुक्त करण्यात आले आहे. हे पथक आष्टी नगरपंचायत हद्दीतील भटक्या श्वानांना पकडून कार्गो हॉस्पिटलमध्ये आणणार आहे. तेथे शास्त्रोक्त पद्धतीने त्यांच्यावर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया केली जाईल. शस्त्रक्रियेनंतर श्वानांची चार दिवस विशेष देखभाल करण्यात येणार आहे. प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना रेबीज प्रतिबंधक लस देऊन पुन्हा त्यांच्या मूळ ठिकाणी सोडण्यात येईल.

सुसज्ज ऑपरेशन थिएटर; १०० श्वानांच्या देखभालीची क्षमता

डॉ. हनुमंत शेळके आणि डॉ. स्वाती जोगदंड (शेळके) यांच्या युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटीच्या माध्यमातून विविध शहरे आणि ग्रामीण भागांत प्राणी कल्याण तसेच श्वान निर्बीजीकरणाच्या मोहिमा राबविण्यात येतात. मुंबई, पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर महानगरपालिकांसह पंढरपूर, सांगोला, इंदापूर, चाळीसगाव, भोर, बारामती, राजगुरुनगर आणि शिरूर-घोडनदी नगर परिषद तसेच विविध ग्रामपंचायतींसोबत ही संस्था काम करीत आहे.

Ashti Stray Dog Sterilization Center
Beed News| 'हॉटेल मामा काठीयावाडी', 'बालाजी खवा केंद्राला' FDA दणका! २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

संस्थेकडे सुसज्ज ऑपरेशन थिएटर, श्वान पथकासाठी निवासाची व्यवस्था आणि एकावेळी १०० श्वानांना दाखल ठेवण्याची क्षमता आहे. या सुविधांमुळे श्वानांवर शस्त्रक्रिया करण्यासह त्यांच्या उपचारांची आणि देखभालीची व्यवस्था करणे शक्य होणार आहे.

नागरिकांची सुरक्षितता आणि प्राण्यांचे आरोग्य

भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण केल्यामुळे त्यांच्या संख्येतील अनियंत्रित वाढ रोखण्यास मदत होणार आहे. तसेच रेबीज प्रतिबंधक लसीकरणामुळे या आजाराचा धोका कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. नागरिकांची सुरक्षितता आणि प्राण्यांचे आरोग्य या दोन्ही बाबींचा समतोल साधण्याच्या दृष्टीने आष्टी नगरपंचायतीचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या वेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी बाळदत्त मोरे, नगराध्यक्षा जिया बेग, माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे, डॉ. हनुमंत शेळके, डॉ. स्वाती जोगदंड (शेळके), नगरसेवक किशोर झरेकर, शरीफ शेख, सुरेश वारुंगुळे, अक्षय धोंडे, बाळासाहेब घोडके, ज्ञानदेव राऊत, इरशान खान, समीर शेख, अथहर बेग, गहिनीनाथ शिरसाठ, सूरज रोकडे, विजय साठे, गणेश काकडे, गणेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Ashti Stray Dog Sterilization Center
Beed accident: कासारी पुलाजवळ भीषण अपघात; एक ठार, एक गंभीर जखमी

भटक्या श्वानांच्या निर्बीजीकरण आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे. भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविणे, नागरिकांची सुरक्षितता जपणे आणि प्राण्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. श्वानांना इजा न करता मोहिमेसाठी येणाऱ्या पथकाला सहकार्य करावे. आष्टी शहर अधिक सुरक्षित आणि रेबीजमुक्त करण्यासाठी नगरपंचायतीच्या या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे.

— जिया बेग, नगराध्यक्षा, आष्टी नगरपंचायत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news