

Beed accident:
कडा : राजू म्हस्के
साबलखेड ते आष्टी राष्ट्रीय महामार्ग वाहनधारकांसाठी दिवसेंदिवस जीवघेणा ठरत असून, रस्त्याच्या अपूर्ण कामाचा आणि असुरक्षित वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कासारी पुलाजवळ रविवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात शहाबाज शब्बीर सय्यद (वय ३५, रा. भिंगार) याचा जागीच मृत्यू झाला, तर स्वस्तिक गणेश साळवे (वय २३, रा. भिंगार) हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामखेडहून अहिल्यानगरकडे जात असताना कासारी पुलाजवळ रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार उलटली. अपघाताची तीव्रता इतकी होती की, कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी स्वस्तिक साळवे याला उपचारांसाठी अहिल्यानगर येथे हलविण्यात आले. मृत शहाबाज सय्यद याच्या मृतदेहाचे आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.
साबलखेड ते आष्टी महामार्गावरील अपूर्ण कामे, रस्त्याची दुरवस्था आणि वाहनचालकांना वेळेत सूचना मिळाव्यात यासाठी आवश्यक असलेल्या सुरक्षा उपाययोजनांचा प्रश्न या अपघातामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. रस्त्याचे काम सुरू असताना वाहनचालकांना योग्य दिशादर्शक फलक, धोकादायक ठिकाणी स्पष्ट सूचना आणि आवश्यक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मात्र, या मार्गावरील परिस्थितीबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
महामार्गाचे काम सुरू असणे ही वेगळी बाब आहे; मात्र, हे काम तीन ते चार वर्षांपासून सुरू असेल, तर त्यामुळे वाहनधारकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये, याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची आहे. अपूर्ण रस्त्यांमुळे अपघाताचा धोका वाढत असेल, तर केवळ काम सुरू असल्याचे कारण देऊन जबाबदारी झटकता येणार नाही.
‘दै. पुढारी’ने यापूर्वीही या अपूर्ण रस्त्याच्या प्रश्नावर अनेक वेळा विशेष वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, त्यानंतरही कासारी पुलाजवळ झालेल्या या भीषण अपघातामुळे रस्त्याच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. यापूर्वीच धोक्याची जाणीव करून दिलेली असतानाही आवश्यक उपाययोजना का केल्या नाहीत, याची चौकशी होणे गरजेचे आहे. या अपघाताची सखोल चौकशी करून रस्त्याच्या कामातील त्रुटी, सुरक्षा उपाययोजनांची स्थिती आणि अपघातास कारणीभूत ठरलेल्या बाबी स्पष्ट कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
रस्ते विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या कामांमुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होणे ही गंभीर बाब आहे. अपघात घडल्यानंतर घटनास्थळी धाव घेणे आवश्यकच; मात्र, अपघात घडू नयेत यासाठी आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे आहे. संबंधित राष्ट्रीय महामार्ग यंत्रणा आणि प्रशासनाने कासारी पुलाजवळील धोकादायक ठिकाणांची तातडीने पाहणी करावी, अपूर्ण कामे सुरक्षित पद्धतीने पूर्ण करावीत आणि आवश्यक सुरक्षा व्यवस्था उभारावी.
या अपघातामुळे एका कुटुंबाचा आधार हिरावला गेला असून, दुसरा तरुण गंभीर जखमी होऊन उपचार घेत आहे. या घटनेतून तरी प्रशासनाने धडा घ्यावा. साबलखेड ते आष्टी महामार्गावरील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करून वाहनधारकांचा प्रवास सुरक्षित करणार, की आणखी एखाद्या निष्पाप जीवाचा बळी गेल्यानंतरच यंत्रणा जागी होणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.