

Ashti Diesel Theft Case
आष्टी : आष्टी तालुक्यात डिझेल चोरी करणाऱ्या टोळीविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत सुमारे ४०० ते ४५० लिटर डिझेल, डिझेल काढण्यासाठी वापरण्यात येणारी मोटार आणि पाइप जप्त करण्यात आले. तसेच चोरीच्या गुन्ह्यांत वापरलेली बीएमडब्ल्यूसह चार चारचाकी वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली असून, या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.
शनिवार (दि. २४) सकाळी सहाच्या सुमारास आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिझेल चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती पोलीस अंमलदार नागेश लोमटे यांना मिळाली. त्यांनी प्रभारी अधिकारी भारत पांढरे यांना याबाबत कळविले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक नाना सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कारवाई सुरू केली.
सकाळी सातच्या सुमारास जामखेड–आष्टी मार्गावरील चिंचपूर परिसरात काळ्या काचा असलेली विनानंबरची स्विफ्ट कार पोलिसांना संशयास्पद आढळली. पोलिसांनी पाठलाग करून कार थांबवली. यावेळी गोविंद पोपट शिरसाट (रा. मातकुळी, ता. आष्टी, जि. बीड) याने पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्याला पकडले. कारची झडती घेतली असता ११ ड्रममध्ये डिझेल आढळून आले.
तपासादरम्यान डिझेल चोरीच्या गुन्ह्यांत वापरलेली आणखी तीन वाहने ताब्यात घेण्यात आली. त्यामध्ये बीएमडब्ल्यू कारचाही समावेश आहे. या टोळीत मातकुळी येथील २० ते ३० वयोगटातील काही तरुण सहभागी असल्याचा संशय आहे. अटक केलेल्या आरोपीविरुद्ध अहिल्यानगरसह इतर जिल्ह्यांतही डिझेल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
भारत पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाना सूर्यवंशी, नागेश लोमटे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. टोळीचे इतर सदस्य आणि चोरीच्या घटनांची व्याप्ती याबाबत पुढील तपास सुरू आहे.