Beed News| 'हॉटेल मामा काठीयावाडी', 'बालाजी खवा केंद्राला' FDA दणका! २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

अस्वच्छता आणि सुरक्षेचे नियम धाब्यावर; खवा, मावा आणि रेड चिली पावडरचा साठा ताब्यात
Food And Drug Administration
'हॉटेल मामा काठीयावाडी', 'बालाजी खवा केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई File Photo
Published on: 
Updated on: 

बीड : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने बीड जिल्ह्यात तपासणी मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेदरम्यान विविध ठिकाणी अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळून आले असून, तीन ठिकाणचे अन्न व्यवसाय परवाने रद्द करण्यात आले आहेत. तसेच खवा, मावा आणि रेड चिली पावडरसह मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे. २३ ऑक्टोबर रोजी सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांच्या विक्री व उत्पादन केंद्रांची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान अस्वच्छता, अयोग्य साठवणूक, कीटकप्रतिबंधक उपाययोजनांचा अभाव, तसेच आवश्यक नोंदी आणि प्रमाणपत्रे नसल्याचे आढळून आले.

तीन ठिकाणचे परवाने निलंबित

बीड जिल्ह्यातील काही अन्न व्यवसायांची तपासणी केली असता, स्वच्छता आणि अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार संबंधित व्यवसायांवर कारवाई करण्यात आली. धुळे-सोलापूर महामार्गावरील मांजरसुंबा येथील मे. मामा काठियावाडी, बीड येथील मांजरसुंबा परिसरातील संबंधित हॉटेल आणि इतर तपासणी केलेल्या व्यवसायांमध्ये त्रुटी आढळल्याने प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. मांजरसुंबा येथील मे. मामा काठियावाडी हॉटेलचा अन्न परवाना २३ ऑक्टोबरपासून तात्काळ निलंबित करण्यात आला आहे.

खवा आणि माव्याचा मोठा साठा जप्त

दिवाळीच्या काळात मिठाई तयार करण्यासाठी खवा आणि माव्याची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खवा विक्री केंद्रांवरही तपासणी केली. बीड येथील बालाजी खवा विक्री केंद्रातून सुमारे ७० किलो खवा जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत अंदाजे १९ हजार ६०० रुपये असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.तसेच ताडसोन्ना परिसरातील खवा विक्री केंद्राच्या तपासणीत परवान्याशिवाय व्यवसाय सुरू असल्याचे आढळले. तेथून सुमारे २४ किलो खवा जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत अंदाजे ६ हजार ७२० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

रेड चिली पावडरचा २९८ किलो साठा जप्त

बीड शहरातील मे. गोरे बंधू मसाले येथील तपासणीदरम्यान रेड चिली पावडरचा साठा आढळून आला. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याने सुमारे २९८ किलो रेड चिली पावडर जप्त करण्यात आली. या साठ्याची किंमत अंदाजे १४ हजार ९०० रुपये असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे. जप्त करण्यात आलेले खाद्यपदार्थ अधिकृत नमुना विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित उत्पादक आणि विक्रेत्यांविरुद्ध कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

अन्न व्यवसायाच्या ठिकाणी स्वच्छता राखणे, योग्य तापमानात खाद्यपदार्थांची साठवणूक करणे, आवश्यक परवाने आणि नोंदी ठेवणे तसेच अन्न सुरक्षा नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. दिवाळीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने व्यापारी आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. संशयास्पद किंवा निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news