बीड : महाशिवरात्रीनिमित्त परळी वैजनाथ मंदिर सज्ज | पुढारी

बीड : महाशिवरात्रीनिमित्त परळी वैजनाथ मंदिर सज्ज

रविंद्र जोशी

परळी वैजनाथ :  महाशिवरात्रीनिमित्त ज्योतिर्लिंग क्षेत्र प्रभू वैजनाथ मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण मंदिर परिसर १०० सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून देखरेखीखाली राहणार आहे. मंदिरात अभिषेक करणाऱ्यांसाठी स्वतंत्र रांग सुद्धा ठेवण्यात आली असून महाशिवरात्र पर्वकाळात परळीत सुमारे ५ लाख भाविक दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदिर परिसरासह शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैजनाथांच्या दर्शनासाठी महाशिवरात्री निमित्त वैजनाथ देवस्थान कमिटीने दर्शनार्थींसाठी स्त्री-पुरूष व पास धारक अशा तीन स्वतंत्र रांगा ठेवल्या आहेत. मंदिराच्या पायऱ्यावर भव्य मंडप उभारण्यात आला असून नागमोडी वळण पद्धतीने दर्शनार्थी भाविकांसाठी बॅरीकेटस्‌ उभे करून रांगा लावल्या जाणार आहेत.  मंदिर परिसरात १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याची माहिती देवस्थानकडून देण्यात आली आहे.

दरम्यान नेहमीप्रमाणेच मुख्य प्रवेशद्वारात दर्शन रांगेतील भाविकांची तपासणी करून त्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. कॅमेरा, मोबाईल, हॅण्डबॅग किंवा पिशवी असे कोणतेही साहित्य मंदिराच्या आत घेवून जाण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. शुक्रवारी ८ मार्चला महाशिवरात्री असून आदल्या दिवशीपासून रात्री १२ वाजल्यानंतर महाशिवरात्री निमित्त दर्शनार्थी भाविकांची गर्दी सुरू राहणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा रात्रीपासूनच कार्यान्वीत केल्या जाणार आहेत. सुमारे ५ लाख भाविक महाशिवरात्री निमित्त श्रीं चे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावतील, असे अपेक्षित धरुन तयारी केली जात आहे.

मंदिर परिसरात ३०० हुन अधिक पोलीस कर्मचारी तैनात

महाशिवरात्री निमित्त भाविकांची मोठी संख्या लक्षात घेवून दर्शन रांगेतील भाविकांना कोणताही त्रास होवू नये, भाविकांना व्यवस्थितपणे मंदिरात जाऊन दर्शन घेता यावे, यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. २० पोलीस अधिकारी, १५० महिला व पुरुष कर्मचारी, १०० होमगार्ड, एक दंगल नियंत्रण पथक (२५ कर्मचारी), डीबी पथक, शहर वाहतूक पथक,  अग्निशमन पथक सुरक्षेसाठी तैनात केल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे. दरम्यान भाविकांनी दर्शनाला जाताना नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

१०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मंदिर परिसरावर नजर राहणार असून स्थानिक पोलिस व खाजगी सुरक्षा यंत्रणा यांची सुलभ दर्शनासाठी मदत घेतली जाणार आहे. भाविकांना सुरळीतपणे दर्शन घेता यावे, अशी व्यवस्था देवस्थान समितीकडून करण्यात आली आहे.

– व्यंकटेश मुंडे,  तहसीलदार तथा अध्यक्ष वैद्यनाथ देवस्थान परळी वैजनाथ

 

हेही वाचा :

Back to top button