Beed District Bank Scam : शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर खात्यातील ७३ हजार झाले गायब? बीड जिल्हा बँकेतील प्रकार

File Photo
File Photo

नेकनूर; पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नेकनुर शाखेत अधिकारी दलालांचे रॅकेट कार्यरत असुन मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यातील पैसे व्यावस्थापक, रोखपाल यांनी संगनमताने काढून सुमारे ७३ हजार ३९२ रुपयांचा अपहार केला आहे. या प्रकरणी चौकशी करून जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड, मुख्य कार्यकारी अधिकारी दि. बीड, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बीड, यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

यापुर्वीही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चौसाळा शाखेतून गोलंग्री आणि कानडी घाट येथील मृत शेतकऱ्यांच्या खात्यावरील पैसे परस्पर उचलण्यात आल्याचे प्रकार घडले होते. संबधीत चौसाळा शाखेतील ३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित देखील करण्यात आले होते.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भगवान गणपती सिरसट, रा.वडगाव (कळसंबर) ता.जि.बीड यांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.बीड नेकनुर शाखेत बचतखाते आहे. सिरसट यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या खात्यावरील सुमारे ७३,३९२ रूपये शाखा व्यवस्थापक, रोखपाल यांनी संगनमताने परस्पर खात्यातुन काढून घेतले आहेत. संबंधित प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या खात्यावरील नेकनुर शाखेतील शिल्लक रकमेची विचारणा केली असता व्यावस्थापक, रोखपाल यांनी कोर्टाचे वारस प्रमाणपत्र आणायला सांगितले. वारस प्रमाणपत्र दिल्यानंतर सुद्धा वडिलांच्या खात्याचा उतारा मागितला असता टोलवाटोलवी करत दिला नाही. आम्ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य शाखा बीड येथुन खाते उतारा काढला असता त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या खात्यावरील एकुण ७३,३९२ रुपये रक्कम परस्पर काढल्याचे आढळुन आले. त्यामुळे संबंधित प्रकरणात व्यावस्थापक, रोखपाल यांनी संगनमताने अपहार केला आहे. याची चौकशी करून माझी रक्कम द्यावी आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक बीड व सपोनि नेकनुर पोलिस स्टेशन यांना केली आहे.

– अर्जुन भगवान सिरसट (मयत शेतक-याचा मुलगा)

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news