

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : ठाकरे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी उलटतपासणीत सुरत-गुवाहाटी दौऱ्यावरून टोलेबाजी केली. सुरतला एकट्यानेच गाडीने गेलो. 'छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) तिकडे गेले होते, म्हणून मला वाटले ते चांगले ठिकाण असणार म्हणून मी तिकडे गेलो' असे खळबळजनक उत्तर गोगावले यांनी दिले. तसेच सत्तांतराच्या काळात दिलेल्या मुलाखतीत तुम्ही मंत्री होण्याची इच्छा व्यक्त करत होतात या प्रश्नावर, 'कुठे झालो मी मंत्री? इच्छा प्रत्येकाची असते. मी अजून कुठे मंत्री झालो आहे' असा प्रतिप्रश्न गोगावलेंनी केला.
उलटतपासणीतील दावे, प्रतिदावे व लेखी सादर पुराव्यांच्या आधारे आता अंतिम युक्तिवाद केला जाईल. सोमवारपासून सलग तीन दिवस हा युक्तिवाद चालेल.त्यासाठी दोन्ही गटांना साधारण दीड दिवस मिळतील. २० डिसेंबर रोजी युक्तिवाद पूर्ण करण्याबाबत राहूल नार्वेकर आग्रही आहेत. युक्तिवाद पूर्ण झाल्यावर विधानसभा अध्यक्ष अंतिम निकालाचा दिवस निश्चित करतील.
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे नव्हते. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदी कायम रहावे. पण, महाविकास आघाडीतून बाहेर पडावे इतकाच आग्रह होता, अशी भूमिका मंत्री दीपक केसरकर यांनी उलटतपासणीत मांडला. त्यावर, मुख्यमंत्री पद नको होते तर महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे ठराव का पाठविलात, याच ठरावामुळे उद्धव ठाकरे यांना शिवसेना आमदारांचा पाठिंबा गमावल्याचे राज्यपालांचे मत बनले आणि त्यांनी ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिल्याचे सांगत ठाकरे गटाच्या वकिलांनी प्रश्नाची सरबत्ती केली. तर, सुरत-गुवाहाटीचा खर्चाचा प्रश्न वैयक्तिक माहिती असल्याचे सांगत केसरकरांनी टोलवला. लोकप्रतिनीधीचा प्रवास व हॉटेलचा खर्च 'थर्ड पार्टी'ने केले का, असा आरोप खोटा असल्याचे केसरकर म्हणाले.
हेही वाचा :