बीड : मराठा आरक्षणासाठी तरूणाने पाण्याच्या टाकीवरून उडी मारून जीवन संपवले | पुढारी

बीड : मराठा आरक्षणासाठी तरूणाने पाण्याच्या टाकीवरून उडी मारून जीवन संपवले

अंबाजोगाई; पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना सरकार या आरक्षणाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथील एका तरूणाने शुक्रवारी रात्री ११.३० वाजता पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आपली जीवन यात्रा संपविली. शत्रुघ्न अनुरथ काशीद (वय 43) असे मृत तरुणाचे नाव आहे.

या घटनेने जिल्हा हादरला असून मृतदेहाचे उत्तरणीय तपासणी केल्यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पार्थिव ठेवून सर्व मराठा समाज एकत्र झाला होता. शासनाचा निषेध करत मराठा आरक्षण जाहीर करावे, असे लेखी आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याशिवाय पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाहीत, असा पावित्रा मराठा आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे महसूल व पोलिस प्रशासनाने या आंदोलकांसमोर आपले हात ठेकवले आहेत.

या तरूणाने शंभर फूट उंच असलेल्या पाण्याच्या टाकीवर जावून मनोज जरांगे- पाटील यांच्या व मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणा देण्यास सुरूवात केली. सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी त्याने यावेळी केली. ग्रामस्थांनी बर्दापुर पोलिसांना पाचारण केले. सर्व ग्रामस्थांनी त्याला विनवणी करत त्याचा खाली उतरण्याची विनंती केली. परंतु तो त्याच्या ठाम भूमिकेत राहून त्याने पाण्याच्या टाकीवरून उडी घेत ग्रामस्थ व पोलिस प्रशासनाच्या समक्ष उडी टाकून आपली जीवनयात्रा संपविली.

या घटनेची माहिती समाज माध्यमांवर पडताच बीड जिल्ह्यात एकच खळबळ माजली. रात्री ग्रामस्थ व पोलिसांनी तरूणाचा मृतदेह रूग्णालयात दाखल केला. परंतु, त्याला मृत घोषित केले. आज (दि.२८) सकाळी पार्थिवाची उत्तरणीय तपासणी करून डॉक्टरांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. परंतु, मराठा आंदोलकांनी मृतदेह छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठेवला. सकाळी ११ वाजता ठेवलेला मृतदेह सायंकाळपर्यंत ठेवण्यात आला होता. तहसीलदार विलास तरंगे पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कविता नेरहकर, पोलीस निरीक्षक विनोद घोळवे, नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांची विनंती आंदोलकांनी धुडकावून लावली.

वयोवृद्ध आई-वडील व पत्नी, तीन मुले पडले उघड्यावर

शत्रुघ्न काशीद याचे आई-वडील वयोवृद्ध असून त्याच्या पश्‍चात पत्नीसह तीन मुले आहेत. त्यामुळे कुटूंब उघड्यावर पडल्यामुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. शत्रुघ्न हा दहावी उत्तीर्ण असून गिरवली परिसरातील एका हॉटेलवर वस्ताद (आचारी) म्हणून काम करत होता.

दहा महिन्यापूर्वीच धाकट्या मुलाने जीवन संपवले.

अनुरथ काशिद यांना तीन मुले होती. त्यातील थोरला हा शत्रुघ्न नंबर दोनचा अंबाजोगाईत किराणा दुकान चालवितो. तर तीन नंबरच्या मुलाने दहा महिन्यापुर्वीच आपली जीवनयात्रा संपविली होती.

वडिलोपार्जित पाच एकर जमीन परंतु मुलांनी केली विक्री

अनुरथ काशीद यांना गिरवली शिवारात पाच एकर कोरडवाहू जमीन होती. परंतु तिन्ही मुलांनी ही जमीन विक्री केली होती. यामध्ये थोरला भाऊ शत्रुघ्न याच्यावरच घराची उपजिविका होती.

काशिद कुटुंबियात एकाला नोकरीचा प्रस्ताव सादर करणार

शत्रुघ्न काशीद याने मराठा आरक्षणासाठी आपले जीवनदान दिले आहे. त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 25 लाख रूपये निधी देण्याचा, कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीचा देखील प्रस्ताव आजच शासनाकडे पाठवत आहे. तसेच महसुल प्रशासन, पंचायत समिती व कृषी खात्याअंतर्गत ज्या योजना या कुटुंबाला लागू होतील. त्या योजनांचा तत्काळ लाभ देण्यात येईल.

– विलास तरंगे, तहसीलदार, अंबाजोगाई

संबंधित बातम्या : 

Back to top button