मराठा आरक्षणासाठी सांगलीत साखळी उपोषण | पुढारी

मराठा आरक्षणासाठी सांगलीत साखळी उपोषण

सांगली; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ आजपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले.

मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र हे आश्वासन न पाळल्याने जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. त्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी येथे डॉ. संजय पाटील, राहुल पाटील, प्रशांत भोसले, अमोल चव्हाण, प्रशांत सूर्यवंशी, योगेश सूर्यवंशी, अभिजित पाटील आदी आंदोलक आंदोलनात सहभागी झाले आहेत.
सुरुवातीच्या टप्प्यात साखळी उपोषण करून आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा इशारा येथील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोनीत नेत्यांना गावबंदी

मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी, तसेच सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा ठराव येथे झालेल्या विशेष ग्रामसभेत घेण्यात आला. त्याचबरोबर मनोज जरांगे- पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.
सोनी येथे शुक्रवारी झालेल्या विशेष ग्रामसभेत मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. आम्हाला राजकीय नको, पण शिक्षणात आणि नोकरीमध्ये आरक्षण द्या, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. यावेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनकर पाटील, सरपंच शारदा यादव, उपसरपंच सुरेश मुळीक, अरविंद पाटील, गजानन पाटील, राजेंद्र पाटील, शरद पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Back to top button