बीड : घटस्थापनेने श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्रौत्सवास प्रारंभ | पुढारी

बीड : घटस्थापनेने श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्रौत्सवास प्रारंभ

अंबाजोगाई; पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्राचे शक्तीपीठ  व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास आजपासून (दि.१५) घटस्थापना व महापूजेने प्रारंभ झाला. तहसीलदार, तथा देवल कमेटीचे अध्यक्ष विलास तरंगे व मयुरी विलास तरंगे  यांनी श्री योगेश्वरी देवीची विधीवत महापुजा केली. महापूजेनंतर योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
१५ आॅक्टोबर ते २४ आॅक्टोबर या कालावधीत  श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव साजरा होत आहे. आज (रविवारी) सकाळी नऊ वाजता तसीलदार तरंगे यांच्या हस्ते  देवीची विधीवत महापुजा संपन्न झाली. यावेळी  देवल कमेटीचे सचिव अँड. शरद लोमटे, मुख्य पुजारी सारंग पुजारी, विश्वस्त भगवानराव शिंदे, राजकिशोर मोदी, अक्षय मुंदडा, पृथ्वीराज साठे, कमलाकर चौसाळकर, प्रा. अशोक लोमटे, उल्हास पांडे, श्रीराम देशपांडे, संजय भोसले, संध्या जाधव, गौरी जोशी, पूजा राम  कुलकर्णी यांच्यासह पुरोहित,  मानकरी व भाविक उपस्थित होते. महापुजेनंतर देवीची महाआरती करण्यात आली.  घटस्थापनेनंतर श्री योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रंचड गर्दी केली होती. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी देवल कमिटीच्या वतीने सर्व सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

विविध उपक्रमांची रेलचेल

 नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने रविवारपासून  देवीच्या मंदिरात कीर्तन, प्रवचन, भजन आदि उपक्रम सुरू झाले आहेत. आज ( दि.१५)  दुपारी अंबाजोगाई येथे मन्मथ महिला भजनी मंडळ, योगेश्वरी महिला भजनी मंडळ, पुत्रेश्वर महिला भजनी मंडळ, पवणसुत महिला भजनी मंडळ यांचा कार्यक्रम पार पडला. तर मुकुंदराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. श्रीकिसन महाराज पवार यांचे किर्तन झाले.
हेही वाचा 

Back to top button