Navratri 2023 : अंबाबाईची नऊ दिवस विविध रूपांत पूजा | पुढारी

Navratri 2023 : अंबाबाईची नऊ दिवस विविध रूपांत पूजा

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  रविवारपासून नवरात्र उत्सवास प्रारंभ होत आहे. याची तयारी करवीर निवासिनी अंबाबाईसह नवदुर्गा मंदिरांत करण्यात आली आहे. करवीर निवासिनी अंबाबाई, जुना राजवाडा येथील तुळजाभवानी मंदिरासह नवदुर्गा मंदिरांत देवींची विविध रूपांत पूजा बांधण्याचे नियोजन पुजारी व देवस्थान व्यवस्थापन समितीने केले आहे. (Navratri 2023)

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठातील प्रमुख पीठ असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाईचा नवरात्रौत्सव सर्वत्र प्रसिद्ध आहे. या कालावधीत देशभरातून सुमारे 15 ते 20 लाखांवर भाविक कोल्हापुरात दाखल होणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासनासह देवस्थान समिती सज्ज झाली आहे.

भवानी, टेंबलाई, नवदुर्गा मंदिरे सज्ज

करवीर निवासिनी अंबाबाई, दख्खनचा राजा जोतिबा, जुना राजवाडा येथील तुळजा भवानी मंदिर, टेंबलाई टेकडीवरील त्र्यंबोली मंदिर यासह नवदुर्गा मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. नवरात्र उत्सवानिमित्त दि. 15 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत विविध पारंपरिक धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नऊ दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची विविधता

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. 15 ते सोमवार, दि. 25 ऑक्टोबर या कालावधीत दुपारी 1 ते रात्री 8 यावेळेत चार सत्रांत विविध कार्यक्रम होणार आहेत.

रविवारी (दि. 15) ओम महिला भजनी मंडळ कोल्हापूर, सुरश्री भजनी मंडळ विलेपार्ले मुंबई, अनुराग भावभक्ती मंडळ कोल्हापूर यांचे कार्यक्रम आणि वैभवी चोपडे, ऋतिका साळोखे, रसिका विभूते यांचे भरतनाट्यम होईल. सोमवारी (दि.16) स्वामी ओम स्वर तरंग भजनी मंडळ सासने कॉलनी, वीरशैव अक्कमहादेवी मंडळ, समर्थ महिला भजनी मंडळ कराड, स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ नसरापूर पुणे यांची भजन सेवा होणार असून सायंकाळी साडेसहा वाजता शब्दसुरांच्या झुल्यावर कार्यक्रम होईल. मंगळवारी (दि. 17) स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ शाहू मिल, ज्ञानाई सांस्कृतिक मंडळ नवी मुंबई, स्वरगंधी संगीत विद्यालय बेळगाव, त्रिमूर्ती महिला भजनी मंडळ कोल्हापूर, हनुमान दत्तपंथी सुरेल संगीत भजन यांचे कार्यक्रम होतील. बुधवारी (दि. 18) जनसेवा महिला भजनी मंडळ कोल्हापूर, मंगेशलक्ष्मी महिला भजनी मंडळ, गायन सेवा पुणे, महालक्ष्मी महिला सोंगी भजन कोल्हापूर व स्वरसमर्थ अभंगवाणी पुणे यांचे कार्यक्रम होतील. गुरुवारी (दि.19) विठ्ठलपंथी भजनी मंडळ कोल्हापूर, सद्गुरू सेवा भजनी मंडळ उंचगाव, कल्लेश्वर भजनी मंडळ अब्दुललाट, ज्ञानाई भजनी मंडळ नवी सांगवी पुणे यांचे भजन आणि सौ. सायली होगाडे यांचे भरतनाट्यम होईल. शुक्रवारी (दि. 20) गजानन दत्तमाऊली महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम, संकेत जोशी (अमरावती) यांचे तबलावादन व शास्त्रीय संगीत, स्वप्ना कुंभार-देशपांडे यांचे भरतनाट्यम, विठू माऊली सोंगी भजन कोल्हापूर व धुंदी कळ्यांना कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. (Navratri 2023)

शनिवारी (दि.21) बालाजी भजनी मंडळ कोल्हापूर, वाघजाई भजनी मंडळ आळंदी, अंतरंग महिला ग्रुप मंगलधाम, स्वामी समर्थ सोंगी भजन वडणगे आणि सिद्धकला डान्स म्हाप्सा (गोवा) यांचे सादरीकरण होईल. रविवारी (दि.22) गजनान महाराज भजनी मंडळ सांगली, संगीतानंद अ‍ॅकॅडमी पुणे, ललितांबिका भरतनाट्याम पुणे, अष्टविनायक भजनी मंडळ कौलव, संगीत सेवा कर्नाटक यांचे कार्यक्रम होतील. सोमवारी (दि. 23) सानेगुरुजी महिला भनी मंडळ, लक्ष्मी नृसिंह महिला भजनी मंडळ इचलकरंजी यांच्यासह रितिका निने यांचे भरतनाट्यम, निखळ आनंद ग्रुपचे सादरीकरण आणि मुंबईच्या सौ. अदिती देश्कर-आजरेकर यांचा कथ्थक कार्यक्रम होईल.

शहरात 10 ठिकाणी एलईडी स्क्रीन

नवरात्रौत्सव कालावधीत अंबाबाई देवीचे व पालखीचे थेट दर्शन घेता यावे यासाठी शहरात 10 ठिकाणी एलईडी स्क्रिन लावण्यात येणार आहेत. मंदिर परिसरासह दर्शन रांग, विद्यापीठ हायस्कूल वाहनतळ, घाटी दरवाजा , बिंदू चौक येथे 12 फूट बाय 10 फुटांच्या स्क्रीन लावण्यात येणार आहेत.

शिवप्रतिष्ठानतर्फे दुर्गामाता दौड

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. 15 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत दररोज सकाळी 7 वाजता, शहरातील विविध भागांतून ही दौड निघणार आहे. दि. 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी चौकातून विजयादशमीची महादौड होणार आहे.

करवीर निवासिनी अंबाबाईच्या यंदाच्या नवरात्रातील पूजा

1) प्रतिपदा ( 15 ऑक्टोबर ) पारंपरिक बैठी पूजा
2) द्वितीया (16 ऑक्टोबर ) श्री महागौरी पूजा
3) तृतीया (17 ऑक्टोबर ) श्री कामाक्षीदेवी पूजा
4) चतुर्थी (18 ऑक्टोबर ) श्री कुष्मांडादेवी पूजा
5) पंचमी (19 ऑक्टोबर ) पारंपरिक गजारुढ पूजा
6) षष्ठी (20 ऑक्टोबर ) श्री मोहिनी अवतार पूजा
7) सप्तमी (21 ऑक्टोबर ) श्री नारायणी नमोस्तूते पूजा
8) अष्टमी (22 ऑक्टोबर ) पारंपरिक महषिासुरमर्दीनी पूजा
9) नवमी (23 ऑक्टोबर ) श्री दक्षिणामूर्तीरूपिणी पूजा
10) दसरा (24 ऑक्टोबर ) पारंपरिक रथारूढ पूजा

मुख दर्शनाची व्यवस्था : अंबाबाई मंदिर परिसरातील दोन ठिकाणी मुख दर्शनाची व्यवस्था केली आहे. गणपती चौक येथून आणि महाद्वार दरवाजा समोरील तात्पूरत्या ब—ीजवरून भाविकांना मुख दर्शन घेता येणार आहे. (Navratri 2023)

हेही वाचा : 

Back to top button